ऑनलाईन टीम / मुंबई :
मुंबै बँक बोगस मजूर आणि आर्थिक घोटाळय़ाप्रकरणी विधानपरिषदेचे विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर (pravin darekar)यांना उच्च न्यायालयाने अटकपूर्व जमीन (pre arrest bai)l मंजूर केला आहे. 50 हजारांच्या वैयक्तिक जातमुचलक्यावर हा जमीन देण्यात आला आहे.
मुंबई बँकेतील बोगस मजूर प्रकरणी प्रवीण दरेकर यांची मुंबई पोलिसांकडून दोनवेळा चौकशी करण्यात आली होती. सरकार सूडबुद्धीने कारवाई करत असल्याचा आरोप प्रवीण दरेकर यांनी केला होता. सत्र न्यायालयाने जामीन फेटाळल्यानंतर दरेकरांनी उच्च न्यायालयात धाव घेतली होती. उच्च न्यायालयाने दरेकरांना दिलासा देत 50 हजारांच्या जातमुचलक्यावर अटकपूर्व जामीन मंजूर केला आहे. दरेकरांविरोधातील एफआयआर चुकीचा होता. दरेकरांना ताब्यात घेऊन चौकशी करावी अशी ही केस नव्हती, असेही न्यायालयाने म्हटले आहे.
दरेकर मजूर नसतानाही ते या प्रवर्गातून 1997 पासून मुंबै बँकेच्या संचालकपदी निवडून येत आहेत. त्यांनी मजूर प्रवर्गातून निवडणूक लढवून 20 वर्ष सरकारची फसवणूक केल्याचा आरोप आहे. आम आदमी पक्षाचे धनंजय शिंदे यांनी दरेकर यांच्याविरोधात फसवणुकीचा गुन्हा नोंद केला होता. त्यानंतर राज्याच्या सहकार विभागाने दरेकर यांना मजूर म्हणून अपात्र ठरवले होते. दरेकरांनी बँकेच्या ठेवीदारांची फसवणूक केली आहे. तसेच या बँकेत कोटय़वधींचा घोटाळा झाल्याचाही आरोप आहे.