
प्रतिनिधी /बेळगाव
शुक्रवारी श्रीमूर्ती विसर्जन असल्याने या पार्श्वभूमीवर शहर आणि उपनगरांतील विसर्जन तलाव सज्ज करण्यासाठी आवश्यक तयारी सुरू करण्यात आली आहे. तलावांची स्वच्छता करून रंगरंगोटी करण्यात आली होती. विसर्जनासाठी विद्युत रोषणाई करून सुरक्षेच्यादृष्टीने सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्याचे काम सुरू आहे.
यंदा दहाव्या दिवशी अनंत चतुर्दशी असल्याने शुक्रवार दि. 9 रोजी विसर्जन होणार आहे. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेने आवश्यक तयारी सुरू केली आहे. विविध तलावांच्या ठिकाणी अधिकाऱयांची व कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात आली असून याबाबतचा अधिकृत आदेश अद्याप जारी करण्यात आला नाही. बुधवारी सुटी जाहीर झाल्याने गुरुवारी सकाळपर्यंत आदेश जारी होण्याची शक्मयता आहे. शहर आणि उपनगरात आठ ठिकाणी विसर्जन सुविधा उपलब्ध करण्यात आली आहे. यापैकी जुने बेळगाव, कपिलेश्वरतीर्थ, अनगोळ आणि रामेश्वरतीर्थ या ठिकाणी सार्वजनिक गणेशोत्सव मंडळांच्या गणेशमूर्तींचे विसर्जन मोठय़ा प्रमाणात करण्यात येते. त्यामुळे या ठिकाणी खबरदारी घेण्यासह शिस्तबद्धरित्या विसर्जन होण्याकरिता मनपा अधिकाऱयांची नियुक्ती केली जाते. तसेच तलावातील कचरा हटविण्यासाठी व निर्माल्य जमा करण्यासाठी स्वच्छता कर्मचाऱयांची नियुक्ती करण्यात येते. या दृष्टीने अधिकाऱयांची व कर्मचाऱयांची यादी तयार करण्यात आली आहे.
तसेच कपिलेश्वरतीर्थ व रामेश्वरतीर्थ येथे स्टेज उभारण्याचे काम सुरू असून सुरक्षेच्यादृष्टीने हायमास्ट दिवे आणि सीसीटीव्ही कॅमेरे बसविण्यात येत आहेत. विसर्जन तलावाच्या ठिकाणी विद्युत रोषणाई करण्यात येत आहे. विसर्जनाच्या पार्श्वभूमीवर महापालिकेकडून तयारी सुरू आहे.