वृत्तसंस्था /नवी दिल्ली
खेलो इंडिया महिलांच्या 21 वर्षाखालील वयोगटाच्या हॉकी लिग पहिल्या टप्प्यातील स्पर्धेत खेळविण्यात आलेल्या विविध सामन्यात प्रितम सिवाच स्पोर्ट्स फाऊंडेशन आणि साईशक्ती यांनी आपले विजय नोंदविले. दिल्लीतील मेजर ध्यानचंद नॅशनल स्टेडियमवर सुरू असलेल्या या स्पर्धेतील गुरुवारच्या पहिल्या सामन्यात प्रितम सिवाच स्पोर्ट्स फाऊंडेशनने सॅल्युट हॉकी अकादमीचा 12-1 अशा गोलफरकाने पराभव केला. या सामन्यात प्रितम सिवाच स्पोर्ट्स फाऊंडेशनतर्फे कर्णधार तेनू, भव्या, रितिका तसेच सेजल व तम्मन्ना यादव यांनी प्रत्येकी 2 गोल केले. सॅल्युट हॉकी अकादमीतर्फे एकमेव गोल अनुने नोंदविला. या विजयामुळे प्रितम सिवाच स्पोर्ट्स फाऊंडेशनला 3 गुण मिळाले. अ गटातील दुसऱया एका सामन्यात साईशक्तीने हिम अकादमीचा 10-0 असा एकतर्फी फडशा पाडला. या सामन्यात साईशक्तीतर्फे संजना होरो, प्रियांका गुरिया, खुशी यांनी प्रत्येकी 2 तर शशिकला, मोनिका नाग आणि साक्षी शुक्ला तसेच कर्णधार पूनम मुंडू यांनी प्रत्येकी 1 गोल केला.