पंजाबमधील लुधियाना जिल्हय़ातील गडवासू येथील गुरू अंगददेव पशुवैद्यकीय आणि प्राणीशास्त्र विद्यापीठाच्या वैज्ञानिकांनी टाकाऊ पदार्थांपासून भरपूर प्रथिने असणारा चीजस्प्रेड हा पदार्थ बनविण्यात यश मिळविले आहे. मोझरेला चीज बनविताना जे टाकाऊ पाणी उरते, त्यापासून हा पदार्थ बनविण्यात आला आहे.

या विद्यापीठातील साहाय्यक प्राध्यापक डॉ. नितिका गोयल, प्रा. डॉ. पी. के. सिंग आणि एमटेकचे विद्यार्थी अविनाश चंद्र यांनी एक वर्षाच्या प्रयत्नानंतर हे यश मिळविले आहे. चीज तयार करताना बरेच पाणी वापरावे लागते. चीजचे उत्पादन झाल्यानंतर हे पाणी टाकाऊ पदार्थ म्हणून सोडून दिले जाते. या पाण्यात प्रोटिनचे (प्रथिनांचे) प्रमाण भरपूर असते. हे प्रोटिन वाया घालविण्याऐवजी त्यापासून खाण्यायोग्य प्रथिनयुक्त पदार्थ बनविल्यास ते लाभदायक ठरेल, असे प्राथमिक प्रयोगातून दिसून आल्यानंतर आता व्यापारी उत्पादन तंत्रज्ञानही विकसित करण्यात आले आहे. या टाकाऊ पाण्यातून निर्माण झालेला हा प्रथिनयुक्त पदार्थ ब्रेड, गार्लिक ब्रेड, सॅलड, स्नॅक्स, पिझ्झा, पास्ता इत्यादी पदार्थांसह खाता येतो. तसेच त्यांच्यावर स्प्रेड करता येतो. या रिकोटा चीज स्प्रेडमध्ये प्रथिनांसमवेतच उपयुक्त क्षार आणि इतर पोषक द्रव्ये मोठय़ा प्रमाणावर असतात, असे आढळले आहे.