म्हादईप्रश्नी जलस्रोतच्या मुख्य अभियंत्यांना विचारला जाब : प्रमोद बदामींची हकालपट्टी करण्याची मागणी
पर्वरी : सर्वोच्च न्यायालयाच्या निर्देशानुसार देखरेख समितीचा अहवाल न्यायालयात सादर करून सार्वजनिक करावा. त्याचबरोबर जलस्रोत खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांची तातडीने हकालपट्टी करावी, या मागणीसाठी ‘सेव्ह म्हादई, सेव्ह गोवा’ संघटनेतर्फे मंगळवारी दि. 14 येथील जलस्रोत खात्यावर मोर्चा काढून निषेध करण्यात आला. तसेच मुख्य अभियंता बदामी यांच्या कार्यालयात घुसून त्यांना घेराव घालत जाब विचारला. यावेळी प्रज्वल साखरदांडे, आमदार क्रूझ सिल्वा, अॅड. हृदयनाथ शिरोडकर, अभिजित प्रभुदेसाई, अलिना साल्ढाना, जॉन नाझरेथ, तारा केरकर, राजन घाटे, जनार्दन भांडारी, प्रतिमा कुतिन्हो, रामा काणकोणकर आदीसह पदाधिकारी व म्हादईप्रेमी मोठ्या संख्येने उपस्थित होते. म्हादईचे पाणी कर्नाटकातील शेतकऱ्यांसाठी किंवा सामान्य जनतेसाठी वळविले जात नसून अदानी, जिंदल सारख्या बलाढ्यांच्या कारखान्यांना पाणी पुरवण्यासाठी वळविण्यात येणार आहे, असा आरोप अभिजित प्रभुदेसाई यांनी यावेळी केला. बदामी हे न्यायालयीन लढतींबद्दल अनभिज्ञ असल्याचा आरोप निदर्शकांनी केला असून त्यांनी त्वरित नोकरीचा राजीनामा द्यावा, अशी मागणी केली. सुरुवातीला जलस्रोत खात्याच्या प्रवेशद्वारावर पोलिसांनी निदर्शकांना अडविले. त्यामुळे संतप्त निदर्शकांनी प्रवेशद्वार ढकलून खात्याचे मुख्य अभियंता प्रमोद बदामी यांच्या दालनात घुसले. यावेळी हृदयनाथ शिरोडकर, साखरदांडे, अलिना साल्ढाणा, प्रतिमा कुतिन्हो, भांडारी आणि जमलेल्या निदर्शकांनी प्रमोद बदामी यांना जाब विचारून धारेवर धरले.
मुख्यमंत्री डॉ. प्रमोद सावंत कर्नाटकात निवडणूक प्रचारासाठी जातात आणि म्हादईबद्दल ब्र काढत नाहीत, असा आरोप करत निदर्शकांनी निषेध केला. तसेच निदर्शकांनी बदामी यांना त्यांचे मत विचारले असता केवळ सारवासारवीची उत्तरे दिली असता निदर्शकांनी ‘बदामी गो बॅक’ अशा घोषणा देऊन त्यांना धारेवर घेतले. जलस्रोत खात्यात दोन वेळा प्रमोद बदामी यांचा कार्यकाळ वाढवून दिला आहे, तो याच कारणासाठी, असा आरोप निदर्शकांनी यावेळी केला. मुख्य अभियंता बदामी यांनी मॉनिटरिंग रिपोर्ट केरळ येथील एक्स्पर्ट एम. के. प्रसाद यांनी केल्याचे सांगताच निदर्शक संतप्त झाले. त्यांनी रिपोर्ट दाखविण्याचा आग्रह केला मात्र त्यांनी असमर्थता दाखविली. सुमारे दोन तास प्रमोद बदामी यांच्या दालनात निदर्शक थांबले होते. निमंत्रक हृदयनाथ शिरोडकर यांनी सरकारच्या म्हादईबाबत निष्काळजीपणा आणि कर्नाटक राज्यातील मुख्यमंत्री बोम्मई यांनी हल्लीच केलेल्या वक्तव्याबद्दल निषेध केला. यावेळी पोलीस उपअधीक्षक विश्वास कर्पे, पोलीस निरीक्षक अनंत गावकर पोलीस फौज फाट्यासह बंदोबस्तासाठी उपस्थित होते.