प्रयागराजमध्ये दगडफेक, पीएसीच्या ट्रकची जाळपोळ ः रांचीमध्ये गोळीबारात एकाचा मृत्यू
@ नवी दिल्ली / वृत्तसंस्था
प्रेषित मोहम्मद पैगंबर यांच्यावर केलेल्या वादग्रस्त वक्तव्यानंतर भाजप नेत्या नुपूर शर्मा यांच्याविरोधात शुक्रवारी देशभरात निदर्शने करण्यात आली. उत्तर प्रदेश, दिल्ली, कर्नाटक, पश्चिम बंगालमधील अनेक शहरांमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर लोक रस्त्यावर उतरले. या आंदोलनादरम्यान नुपूर शर्माविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. उत्तर प्रदेशातील अनेक शहरांमध्ये दगडफेक आणि तोडफोडीच्या घटना घडल्या. आंदोलकांनी प्रयागराजमध्ये पीएसी ट्रकही पेटवला. झारखंडची राजधानी रांचीमध्येही पोलीस आणि आंदोलकांमध्ये चकमक झाली. या संघर्षादरम्यान गोळीबारात एका आंदोलकाचा मृत्यू झाला आहे.
भाजपच्या माजी प्रवक्त्या नुपूर शर्मा यांनी केलेल्या वादग्रस्त वक्तव्याचे पडसाद देशभर अजूनही उमटत आहेत. आपल्या वक्तव्याचे संतप्त पडसाद उमटू लागल्यानंतर त्यांनी बिनशर्त माफी मागत वक्तव्य मागे घेण्याची घोषणा केली होती. पक्षाने त्यांच्यावर निलंबनाची कारवाई केली असली तरी अजूनही वातावरण शांत झालेले नाही. त्यांच्याविरोधात ठिकठिकाणी गुन्हे दाखल करण्याचे सत्रही वाढलेले दिसत आहे. दिल्ली पोलिसांनी नुपूरसह 33 जणांविरुद्ध द्वेषपूर्ण भाषणाचा गुन्हा दाखल केला आहे. त्यांच्यावर मुंबईतही गुन्हा दाखल करण्यात आला आहे. मात्र, त्यांना जीवे मारण्याच्या आणि बलात्काराच्या धमक्मया येत असल्याने दिल्ली पोलिसांनी त्यांना अतिरिक्त सुरक्षाही पुरविली आहे.
प्रयागराजमध्ये दगडफेक करणाऱयांवर लाठीमार
कानपूरमध्ये 3 जून रोजी झालेल्या हिंसाचारानंतर शुक्रवारी पहिला नमाज अदा करण्यात आला. कानपूरमध्ये वातावरण शांत असले तरी प्रयागराज, मुरादाबाद आणि सहारनपूरमध्ये आंदोलकांनी रस्त्यावर उतरून निदर्शने केली. प्रयागराजमध्ये दगडफेकीत डीएम-एसएसपींसह काही पोलीस अधिकारी जखमी झाले. पोलीस अधीक्षकांच्या वाहनाची तोडफोड करण्यात आली असून रस्त्यावर जाळपोळही झाली. यात निमलष्करी दलाचे काही जवानही जखमी झाले आहेत. सहारनपूरमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर अल्लाह-हू-अकबरच्या घोषणा देण्यात आल्या. यानंतर येथे दगडफेक झाली. प्रयागराजमध्ये आंदोलकांनी पीएसी ट्रक पेटवला. अनेक ठिकाणी परिस्थिती नियंत्रणात आणण्यासाठी पोलिसांना लाठीमार करावा लागला. राज्यातील अनेक शहरांमध्ये दगडफेकीच्या घटनांनंतर उत्तर प्रदेशचे मुख्यमंत्री योगी आदित्यनाथ यांनी दंगलखोरांवर कडक कारवाई करण्याचे निर्देश दिले आहेत.
नुपूर यांची जीभ कापणाऱयाला कोटींचे बक्षीस
उत्तर प्रदेशातील प्रयागराज, सहारनपूर, बाराबंकी, मुरादाबाद, उन्नाव, देवबंदसह अनेक शहरांमध्ये शुक्रवारच्या नमाजानंतर निदर्शने करण्यात आली. सहारनपूरमध्ये तोडफोड आणि प्रयागराजमध्ये दगडफेक झाली. याचदरम्यान भीम आर्मीचे प्रमुख सतपाल तन्वर यांनी नुपूर शर्मा यांची जीभ कापणाऱयाला एक कोटीचे बक्षीस जाहीर केले आहे.
दिल्लीतही तणाव
दिल्लीतील जामा मशिदीत शुक्रवारच्या नमाजासाठी सुमारे 1,500 लोक जमले होते. नमाजानंतर जवळपास 300 ते 400 लोकांनी नुपूर शर्मा यांच्याविरोधात घोषणाबाजी केली. यानंतर तणाव वाढल्याने आमच्याकडून निषेधाचे आवाहन करण्यात आले नव्हते. आंदोलक कोण आहेत, हे आम्हाला माहीत नाही, असे जामा मशिदीच्या शाही इमामांनी स्पष्ट केले.
श्रीनगरसह काश्मीरमध्ये अनेक ठिकाणी निदर्शने
श्रीनगर आणि काश्मीरमधील इतर अनेक शहरांमध्ये नुपूर शर्मा यांच्या वक्तव्याविरोधात घोषणाबाजी करण्यात आली. येथेही नमाजानंतरच निदर्शने सुरू झाली. अनेक ठिकाणी पोस्टर्सही झळकवण्यात आले. या पोस्टर्समध्ये मोहम्मद पैगंबर यांचा अपमान करणाऱयांचा शिरच्छेद देण्याची मागणी करण्यात आली होती.
हावडय़ात भाजप कार्यालय टार्गेट
पश्चिम बंगालमधील कोलकाता आणि हावडा येथील आंदोलकांनी रस्त्यावर उतरून घोषणाबाजी केली. गर्दीत सामील असलेल्या लोकांनीही दुकाने बंद करण्यावरून गोंधळ घातला. यानंतर पोलिसांना अश्रुधुराच्या नळकांडय़ांचा वापर करावा लागला. कोलकात्यात दगडफेक किंवा जाळपोळीच्या मोठय़ा घटना घडल्या नसल्या तरी हावडय़ात बॉम्बफेक झाल्याचे सांगण्यात आले. तसेच भाजप कार्यालयाला आग लावण्याचा प्रयत्नही करण्यात आला.
हैदराबाद मक्का मशिदीबाहेर निदर्शने
तेलंगणातही नमाजानंतर आंदोलकांनी गोंधळ घातला. भाजपच्या निलंबित नेत्या नुपूर शर्मा यांच्या वादग्रस्त वक्तव्याविरोधात राजधानी हैदराबादमधील मक्का मशिदीबाहेर निदर्शने करण्यात आली. त्यानंतर पोलिसांनी बळाचा वापर करून आंदोलकांना पांगवले. परिसरात पोलीस दल आणि सीआरपीएफ तैनात करण्यात आले आहे. पंजाबमधील लुथियाना जामा मशिदीबाहेर निदर्शने करण्यात आली. मध्यप्रदेशातही नमाजनंतर मुस्लीम समाजातील लोकांनी नुपूरच्या अटकेची मागणी करत घोषणाबाजी करत निदर्शने केली.