अरुण म्हात्रे व डॉ. अरुणा ढेरेंची उपस्थिती
प्रतिनिधी/पणजी
गोवा सरकारच्या गोवा मराठी अकादमीतर्फे कविवर्य शंकर रामाणी जन्मशताब्दीच्या सांगता कार्यक्रमानिमित्त दोन महत्त्वपूर्ण पुस्तकांचे प्रकाशन रामाणी यांच्या 101 व्या जयंतीदिनी येत्या रविवार दि. 26 जून रोजी संध्याकाळी 4 वा. कला व संस्कृती भवनच्या बहुउद्देशीय सभागृहात कविवर्य अरुण म्हात्रे यांच्या हस्ते व नामवंत कवयित्री डॉ. अरुणा ढेरे यांच्या अध्यक्षतेखाली होणार आहे.
‘रामाणी ः कविवर्य शंकर रामाणी यांची समग्र मराठी कविता’ हे पुस्तक कवयित्री डॉ. अनुजा जोशी यांनी संपादित केले असून ‘एकटय़ाचे गाणेः कविवर्य शंकर रामाणी यांचे पत्रसंचित’ हे पुस्तक परेश प्रभू यांनी संपादित केले आहे. ही दोन्ही पुस्तके गोवा मराठी अकादमीने प्रकाशित केली आहेत.
या कार्यक्रमास दोन्ही पुस्तकांचे लेखक डॉ. अनुजा जोशी व परेश प्रभू, तसेच गोवा मराठी अकादमीचे अध्यक्ष प्राचार्य अनिल सामंत व सदस्य सचिव मंदार नाईक यांची उपस्थिती असेल.