ऑनलाईन टीम / तरुण भारत :
पुण्याचे ‘मेट्रोमॅन’ अशी ओळख असलेले मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार शशिकांत लिमये यांचे गुरुवारी रात्री हृदयविकाराच्या झटक्याने निधन झाले. ते 71 वर्षांचे होते. पुणे, पिंपरी चिंचवडमधील मेट्रो प्रकल्पासाठी त्यांनी आग्रही भूमिका मांडली होती. (pune metroman shashikant limaye passes away)
लिमये यांना गुरुवारी रात्री आठच्या सुमारास घरी हृदयविकाराचा झटका आला. त्यांना तातडीने खासगी रुग्णालयात नेण्यात आले. परंतु उपचारापूर्वीच डॉक्टरांनी त्यांना मृत घोषित केले. शशिकांत लिमये हे प्रतिष्ठित रेल्वे इंजिनिअर होते. भारतीय रेल्वेतील तज्ज्ञ अधिकारी म्हणूनही ख्याती होती. महाराष्ट्रातील डोंगराळ भागात रेल्वे मार्गांचे विस्तारीकरण कसे करता येईल, तसेच पुण्याभोवती लोहमार्गाचे विस्तारीकरण कसे असावे, याबाबतचे आराखडे त्यांनी तयार केले होते. पुणे शहरातील मेट्रो प्रकल्पासाठी 2012 पासून ते आग्रही होते. 2014 मध्ये त्यांना महामेट्रोद्वारे मेट्रो प्रकल्पाचे सल्लागार म्हणून नियुक्त करण्यात आले.
पुणेकरांचं मेट्रोचं स्वप्न पुर्ण करण्यात लिमये यांचा मोलाचा वाटा होता. पुणे मेट्रोचं नियोजन आणि त्याबाबतच्या तांत्रिक नियोजनासाठी रेल्वे प्रशासनाला त्यांची मोठी मदत झाली होती. रेल्वेत विविध ठिकाणी जबाबदारी पार पाडल्यानंतर विभागीय व्यवस्थापक या पदावरून ते निवृत्त झाले होते. निवृत्तीनंतरही ते सक्रिय होते. तीन खासगी कंपन्यांचे सल्लागार म्हणून त्यांनी काम पाहिले. लिमये यांच्यामागे पत्नी, दोन मुली आणि भाऊ असा परिवार आहे.