लवप्रीत या आरोपीच्या सुटकेची दर्शविली तयारी : अमृतपालच्या समर्थकांचा पोलीस स्थानकावर कब्जा

वृत्तसंस्था / अमृतसर
पंजाबच्या अमृतसर येथील अजनाला पोलीस स्थानकावर खलिस्तान समर्थक अमृतपाल सिंह अन् त्याच्या समर्थकांनी कब्जा केला होता. यानंतर पंजाब पोलिसांनी मोठा यु-टर्न घेतला आहे. अपहरणाचा आरोपी आणि अमृतपालचा निकटवर्तीय लवप्रीत तुफानच्या सुटकेची तयारी पोलिसांनी दर्शविली आहे. लवप्रीतची शुक्रवारी सुटका करण्यात येणार असल्याचा दावा अमृतपालने केला आहे. तर पोलिसांकडून सुटकेचे आश्वासन मिळाल्यावर अमृतपाल सिंह आणि त्याचे समर्थक अजनाला पोलीस स्थानकातून बाहेर पडले आहेत. आमच्यासमोर मांडण्यात आलेल्या पुराव्यांच्या आधारावर लवप्रीत तूफानची सुटका केली जाणार आहे. याप्रकरणी तपासासाठी एसआयटी स्थापन करण्यात आल्याचे अतिरिक्त पोलीस अधीक्षकांनी सांगितले आहे.

पंजाबमध्ये गुरुवारी वारिस पंजाब दे या खलिस्तान समर्थक संघटनेचे हजारो सदस्य अजनाला पोलीस स्थानकावर धावून गेले होते. या सदस्यांच्या हातात बंदुका आणि तलवारी होत्या. संघटनेचा प्रमुख अमृतपाल सिंहचा निकटवर्तीय लवप्रीतच्या अटकेला ते विरोध दर्शवित होते. पोलिसांनी या उग्र जमावाला रोखण्यासाठी बॅरिकेडिंग केले होते, परंतु जमावाने ते तोडून पोलीस स्थानकात प्रवेश केला. या घटनेत 6 पोली जखमी झाले आहेत. अमृतपालने पोलीस स्थानकातूनच पोलिसांना 24 तासांच्या आत लवप्रीतची सुटका न झाल्यास जे घडेल त्याकरता प्रशासन जबाबदार असेल अशी धमकी दिली होती. अकाली दलाचे नेते देखील अमृतपालच्या समर्थनार्थ अजनाला येथे पोहोचले. लवप्रीत विरोधात एफआयआर नोंदविण्यात आला असून यात अमृतपालचे नावही सामील आहे. चुकीचा गुन्हा नोंदविला जाऊ नये. गुन्हय़ात लवप्रीतचा हात नव्हता असे प्रशासनाने मान्य केले आहे. त्याची शुक्रवारी सुटका करण्यात येणार असून एफआयआर रद्द होणार असल्याचे अकाली दलाचे नेते हरपाल सिंह ब्लेयर यांनी म्हटले आहे.
गृहमंत्र्यांना धमकीप्रकरणी यू-टर्न
अमृतपालने गृहमंत्री अमित शाह यांना दिलेल्या धमकीप्रकरणी यू-टर्न घेतला आहे. गृहमंत्र्यांना मी कुठल्याही प्रकारची धमकी दिलेली नाही. खलिस्तानवाद वाढू देणार नसल्याचे अमित शाह यांनी म्हटले हेते. इंदिरा गांधी यांनीही असे केले होते आणि तुम्हीही हेच केल्यास परिणाम भोगावे लागतील असे वक्तव्य केले होते असा दावा अमृतपालने केला आहे. तत्पूर्वी अमृतपालने रविवारी मोगा जिल्हय़ात बोलताना इंदिरा गांधींनी खलिस्तान समर्थकांवर कारवाईचा प्रयत्न केला होता, त्यांचे काय झाले हे सर्वांनाच माहित असल्याचे म्हणत अमित शाह यांनीही स्वतःची इच्छा पूर्ण करू पहावी अशा शब्दात धमकी दिली होती.