स्विस ओपन सुपर 300 बॅडमिंटन स्पर्धा : लक्ष्य सेन पहिल्याच फेरीत पराभूत, दुहेरीत सात्विकसाईराज-चिराग शेट्टीची विजयी सलामी

वृत्तसंस्था /बॅसेल, स्वित्झर्लंड
भारताची अव्वल बॅडमिंटनपटू व ऑलिम्पिक पदकविजेत्या पीव्ही सिंधूने येथे सुरू असलेल्या बीएफडब्ल्यू वर्ल्ड टूर सुपर 300 स्विस ओपन बॅडमिंटन स्पर्धेच्या महिला एकेरीची दुसरी फेरी गाठली. पुरुष विभागात लक्ष्य सेनचे आव्हान मात्र पहिल्याच फेरीत समाप्त झाले. के.श्रीकांत व मिथुन मंजुनाथ यांनीही आगेकूच केली तर सात्विकसाईराज व चिराग शेट्टी यांनी दुसरी फेरी गाठली आहे. सिंधू ही या स्पर्धेची विद्यमान चॅम्पियन असून तिने स्वित्झर्लंडच्या जेनिरा स्टॅडलमनचा 21-9, 21-16 असा केवळ 32 मिनिटांत पराभव केला. तिची पुढील लढत इंडोनेशियाच्या पुत्री कुसुमा वारदानीशी होईल. अन्य एका सामन्यात मालविका बनसोडला कोरियाच्या किम गा यूकडून 21-14, 21-15 असा पराभव स्वीकारावा लागला तर आकर्षी कश्यप जर्मनीच्या वायव्होन लि कडून 21-15, 21-17 असे पराभूत झाली.

श्रीकांत, प्रणॉय विजयी
पुरुष एकेरीच्या सामन्यात राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेतील सुवर्णपदक विजेता लक्ष्य सेनला मात्र पराभवाला सामोरे जावे लागले. जागतिक क्रमवारीत 25 व्या स्थानावर असणाऱया सेनला 19 व्या मानांकित हाँगकाँगच्या चेयुक यिउ लीकडून 21-18, 21-11 असा पराभव स्वीकारावा लागला. आठवे मानांकन मिळालेल्या सेनला सर्वोत्तम खेळ करता आला नाही. लीच्या खेळाशी त्याला बरोबरी करता आली नाही. 2021 वर्ल्ड चॅम्पियनशिपमध्ये रौप्य मिळविणारा माजी अग्रमानांकित किदाम्बी श्रीकांतने पुढील फेरी गाठताना चीनच्या वेंग हाँग यांगवर 21-16, 15-21, 21-18 असा संघर्षपूर्ण विजय मिळविला. दुसऱया फेरीत त्याची लढत सेनला हरविणाऱया लीविरुद्ध होईल. पुरुष एकेरीच्या अन्य एका सामन्यात पाचव्या मानांकित एचएस प्रणॉयने चीनच्या शि यु की याचे कडवे आव्हान 21-17, 19-21, 21-17 असे संपुष्टात आणले. अटीतटीने लढली गेलेली ही लढत तासाहून अधिक काळ रंगली होती. तत्पूर्वी मिथुन मंजुनाथने नेदरलँड्सच्या जोरान क्वीकेलचा 21-8, 21-17 असा पराभव करून उपउपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. त्याची लढत चिनी तैपेईच्या चिया हाओ ली याच्याविरुद्ध होईल. लीने सातव्या मानांकित चीनच्या जुन पेंग झाओला 21-12, 21-13 असा पराभवाचा धक्का दिला. किरण जॉर्जला मात्र पहिल्याच फेरीत पराभव स्वीकारावा लागला.
सात्विकसाईराज-चिराग विजयी
महिला दुहेरीत एन.सिक्की रेड्डी व आरती सारा सुनील यांना स्पर्धेबाहेर पडावे लागले. जपानच्या सायाका होबारा व युइ सुइझु यांच्याकडून त्यांना 12-21, 14-21 अशी हार स्वीकारावी लागली. एन. सिक्की रेड्डीला मिश्र दुहेरीतही पराभूत व्हावे लागले. रोहन कपूरसमवेत ती या विभागात खेळत होती. पुरुष दुहेरीत सात्विकसाईराज रनकिरेड्डी व चिराग शेट्टी या भारताच्या अव्वल जोडीने भारताचे पदक जिंकण्याचे आव्हान राखताना मलेशियाच्या झिन युआन बून व तिएन सि वाँग यांच्यावर 21-15, 21-18 अशी मात करून दुसरी फेरी गाठली. 26 मार्चपर्यंत ही स्पर्धा चालणार आहे.