Raj Thackeray : कोल्हापूरला येऊन देवीचं दर्शन घेऊन कोकण दौऱ्याला सुरुवात करावी अशी माझी इच्छा होती,त्यासाठी कोल्हापुरात आलो आहे. इथून मी कोकण दौऱ्यावर जाणार आहे.आणि तो दौरा संपला की लवकरच मी पश्चिम महाराष्ट्राच्या दौऱ्यावर येणार आहे. मी ह्या आधीपण सांगितलं आहे तेच पुन्हा सांगतोय.येत्या महापालिका निवडणुका महाराष्ट्र नवनिर्माण सेना स्वबळावर लढवणार आहे.राजकीय पक्षांवर शिंतोडे उडवायचे हा ह्याच्यासाठी काम करतो,तो त्याच्यासाठी काम करतो,हे खूप आधीपासून सुरु आहे.शिवसेनेवर पण हे आरोप झाले.मी कोणासाठी काम करत नाही,मी महाराष्ट्र नवनिर्माण सेनेसाठी काम करतो,माझ्या महाराष्ट्रासाठी काम करतो,अशी प्रतिक्रिया मनसे अध्यक्ष राज ठाकरे यांनी आज कोल्हापुरात दिली.
यावेळी बोलताना ते म्हणाले की,जर एखाद्या चित्रपटावर आक्षेप असेल तर आक्षेप घेणाऱ्यांनी सिनेमा न बघताच बोलू नये.आक्षेप असेल,तर लेखक,दिग्दर्शकाशी बोला,त्याने कुठून संदर्भ घेतलेत हे समजवून घ्या आणि मग आक्षेप नोंदवा.पण हे काहीही न करता आक्षेप नोंदवणं चुकीचं आहे.मंत्रिमंडळातील एक मंत्री,एका महिला नेत्याला शिव्या देतो,असले प्रकार मी महाराष्ट्रात ह्या आधी कधी पाहिले नाहीत.ह्याला माध्यमं पण जबाबदार आहेत.काहीही बडबडलं तरी माध्यमं प्रसिद्धी देतात हे पाहून असल्याना अधिक चेव येतो.त्यामुळे माध्यमांनी अधिक जबाबदारीने वागावं असेही ते म्हणाले.
उद्धव ठाकरे यांच्यावर निशाणा साधताना ते म्हणाले की, उद्धव ठाकरे मुख्यमंत्रीपदावर असताना आरोग्याचं कारण सांगून भेटत नव्हते.पुढे मुख्यमंत्रीपदावरून दूर झाले आणि सगळीकडे फिरायला लागले.असं का ? हा माझा प्रश्न होता.माझी टिपण्णी ही प्रकृतीवर नाही तर परिस्थितीवर होती.त्यांच्या प्रकृतीला आराम पडावा हीच इच्छा आहे असो खोचक टोला देत काळजीही दर्शविली.
बेळगाव सीमाप्रश्नी बोलताना ते म्हणाले की, बेळगाव सीमा प्रश्न हा अचानक कसा वर येतो? जर हा प्रश्न न्यायप्रविष्ट आहे तर आत्ताच कर्नाटकचे मुख्यमंत्री का बोलले ? पंढरपूर,जतवर हक्क सांगणं हे आत्ता का सुरु झालं?कुठल्यातरी महत्वाच्या प्रश्नावरून लक्ष वळवून घेण्यासाठी तर हे सुरु नाहीये ना ? असा सवाल त्यांनी उपस्थित केला. कोशियारी हे राज्यपालासारख्या महत्वाच्या संविधानिक पदावर आहेत, त्या पदाचा मान राखून मी काही फार बोलत नाहीये.अन्यथा महाराष्ट्रात शिव्यांना काही कमी नाही.पण कधी वाटतं की महत्वाच्या प्रश्नांपासून दुर्लक्ष व्हावं म्हणून कोशियारींना कोणी स्क्रिप्ट लिहून देत असेल का? असाही सवाल केला.
आत्ताचा भाजप म्हणजे आधीचा जनसंघ,त्याची स्थापना १९५२ ची,पण ह्या पक्षाला केंद्रात पूर्ण बहुमत मिळालं २०१४ ला.शिवसेनेची स्थापना १९६६ ची पण सत्तेत आली १९९५ ला.त्यामुळे राजकीय यश मिळायला वेळ लागतो,पण आम्ही आमची वाटचाल खंबीरपणे सुरु ठेवणार.महाराष्ट्र नवनिर्माण सेना पक्ष मी जेंव्हा २००६ ला स्थापन केला तेंव्हा पक्षात आलेले बहुसंख्य लोकं हे कोणतीही राजकीय पार्श्वभूमी नसलेले होते.आमचा पक्ष स्थापन झाला तेंव्हा तालुक्यात गावांत पक्ष रुजवणारे हे सामान्य कार्यकर्ते होते. मी नागपूर दौऱ्यात असताना बोललो होतो तेच आत्ता बोलतोय की लढा हा त्या त्या ठिकाणच्या प्रस्थापितांशीच द्यायचा असतो.इतिहास हाच आहे की अनेक अभेद्य वाटणारे बालेकिल्ले सुद्धा पडले आहेत त्यामुळे प्रस्थापितांशी संघर्ष करत लढा द्या हेच मी माझ्या महाराष्ट्र सैनिकांना सांगितलं आहे, असेही ते म्हणाले.
Previous Articleगस्तीवरील सागर सुरक्षा रक्षकाला पर्ससीन नौकेने पळवल्याचा आरोप
Next Article अनेक आजारांवर गुणकारी असणारा आवळा
Related Posts
Add A Comment