ऑनलाईन टीम/तरुण भारत
राज्यसभा निवडणुकीची (Rajyasabha Election) मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला!, आता रडीचा डाव सुरू झाला!!, आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!!,” असं म्हणत राऊत यांनी भाजपवर निशाणा साधला. त्यांनी ट्वीटरच्या माध्यमातून भाजपवर हल्लाबोल केला. भाजपने महाविकास आघाडीच्या 3 आमदारांच्या मतदानावर आक्षेप घेतल्याने मतमोजणीला उशीर झाला. त्यामुळे संजय राऊत यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे.
राज्यसभा निवडणुकीसाठी आज सकाळी ९ वाजल्यापासून दुपारी ४ वाजेपर्यंत मतदान झाले. त्यानंतर मतमोजणी होऊन लगेच निकाल जाहीर होईल, अशी आशा होती. मात्र, भाजपने ऐनवेळी केंद्रीय निवडणूक आयोगाकडे धाव घेतल्यामुळे आता राज्यसभा निवडणुकीची मतमोजणीच थांबली आहे. संध्याकाळी पाच वाजता मतमोजणीला सुरुवात होणे अपेक्षित होते. मात्र, आता सात वाजून गेल्यानंतरही मतमोजणीला सुरुवात झालेली नाही. भाजपने यशोमती ठाकूर, जितेंद्र आव्हाड आणि सुहास कांदे यांची मते बाद ठरवावीत यासाठी आक्षेप घेतला आहे. त्यामुळे केंद्रीय निवडणूक आयोगाच्या निकालाची प्रतिक्षा करायची झाल्यास राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी सुरु व्हायला आणखी दोन-तीन तासांचा अवधी लागू शकतो. आणखी काही राज्यांमध्येही भाजपच्या भूमिकेमुळे राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी खोळंबली आहे. यावर संजय राऊत यांनी ट्विट करत आपला संताप व्यक्त केला आहे.
या सगळ्या प्रकारामुळे शिवसेनेचे नेते संजय राऊत संतप्त झाले आहेत. संजय राऊत यांनी ट्विट करून आपला संताप व्यक्त केला आहे. राऊत यांनी अजय माकन यांनी हरियाणातील राज्यसभा निवडणुकीसंदर्भात केलेल्या ट्विटला रिप्लाय दिला आहे. भाजपने खालच्या दर्जाचे राजकारण करत राज्यसभेची मतमोजणी रोखून धरल्याचे माकन यांनी ट्विटमध्ये म्हटले आहे. संजय राऊत यांनी यावर रिप्लाय देत म्हटले आहे की, महाराष्ट्रातही हाच खेळ सुरु आहे. खालच्या दर्जाचे राजकारण, असे संजय राऊत यांनी म्हटले आहे. राज्यसभा निवडणुकीची मतमोजणी का व कोणी थांबवली आहे? ईडीचा डाव फसला! आता रडीचा डाव सुरू झाला!! आम्हीच जिंकू! जय महाराष्ट्र!, असे आणखी एक ट्विटही संजय राऊत यांनी केले आहे.
