वार्ताहर /किणये
तारीहाळ पावन क्षेत्र बडेकोळमठात महाशिवरात्री यात्रोत्सव उत्साहात व भक्तिमय वातावरणात झाला. पाच दिवस विविध कार्यक्रम आयोजिण्यात आले होते. यात्रेला बेळगाव, बागेवाडी, खानापूर, कोल्हापूर व गोवा येथील भक्तांनी उपस्थिती दर्शवली होती. यात्रेचे सर्व कार्यक्रम मठाधीश नागेंद्रस्वामी यांच्या मार्गदर्शनानुसार झाले. यात्रेची मंगळवारी सांगता झाली. शुक्रवारी संतिबस्तवाड येथील बसवेश्वर मंदिर तसेच शिंदोळी येथील रामलिंगेश्वर मंदिर येथून ध्वज मिरवणुका पारंपरिक वाद्यांच्या गजरात निघाल्या. त्या सायंकाळी बडेकोळमठात आल्यानंतर नागेंद्रस्वामी यांच्या हस्ते ध्वजारोहण करून यात्रेला प्रारंभ झाला. शनिवारी मठामध्ये कल्लय्याशास्त्राr व सहकाऱ्यांनी महारुद्राभिषेक केला. विविध दोष निवारणार्थ व सुखसमृद्धीसाठी अभिषेक घालण्यात आला. सायंकाळी तारीहाळ येथील रामलिंगेश्वर मंदिर पालखीची मिरवणूक बडेकोळमठात आली. मिरवणुकीत मास्तमर्डी येथील हरिभजन मंडळाने सहभाग घेतला होता. रात्री गिरमल महाराज यांचे कीर्तन व हिरेबागेवाडी सिद्धेश्वर भजनी मंडळाचा कार्यक्रम झाला.
रविवारी सकाळी 8 वा. रुद्राभिषेक व त्यानंतर श्रींची पाद्यपूजा करण्यात आली. दुपारी नागेंद्रस्वामी यांच्या हस्ते पूजन करून रथोत्सव मिरवणुकीला सुरुवात करण्यात आली. ‘हर हर महादेव’च्या गजरात बडेकोळमठात ही मिरवणूक झाली. यावेळी भाविकांची मोठी गर्दी झाली होती. भाविकांसाठी महाप्रसादाचे आयोजन करण्यात आले होते. महाप्रसाद बनविण्यासाठी यरडाल गावच्या भक्तांनी सहकार्य केले. बलभीम युवक मंडळ, यरमळ्ळी यांच्यावतीने सायकल स्पर्धेचे आयोजन करण्यात आले होते. सायंकाळी हिरेबागेवाडी येथील शाळेच्या विद्यार्थ्यांचा सांस्कृतिक कार्यक्रम झाला. रात्री 10.30 वाजता आनंद साऊंड्स हिरेबागेवाडी यांचा ‘रसमंजिरी’ कार्यक्रम झाला. सोमवारी सकाळी 8 नंतर विविध गावांतील भजनी मंडळांचे भजन कार्यक्रम झाले. दुपारी 3 नंतर हिरेबागेवाडी येथील भाविकांच्या सहकार्यातून खळ्याच्या कुस्त्या झाल्या. रात्री ‘नगेहब्ब’ हा कार्यक्रम झाला. मंगळवारी सकाळी नागेंद्रस्वामी यांच्या हस्ते पालखीचे पूजन करून यात्रेची सांगता झाली.