तालुक्यासह जिल्हय़ात खळबळ, स्थानिक आरोग्य यंत्रणा अद्याप गंभीर नसल्याने आश्चर्य
मंडणगड प्रतिनिधी
तालुक्यातील पाले गावात सापडलेल्या कोरोना बाधीत रुग्णाचा मंगळवारी दापोली येथे मृत्यू झाला. यामुळे तालुक्यासह जिल्हय़ात एकच खळबळ उडाली आहे. हा रुग्ण दम्याच्या त्रासाचा पूर्व इतिहास असल्याने तपासणीसाठी रुग्णालयात नेले असता डॉक्टरना संशय आल्याने त्याची अँटीजन टेस्ट ग्रामीण रुग्णालयात करण्यात आली. यात ते पॉझीटीव्ह आढळल्याने आर.टी.पीसी.आर. तपासणीसाठी या रुग्णास दापोली येथे पाठवण्यात आले होते व पुढील उपचारासाठी तेथेच रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. मात्र या रुग्णाचा मंगळवारी मृत्यू झाला.
गेल्या दोन वर्षातील भूतकाळात तालुक्यातील कोरोना रुग्णांसाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय सोईसुविधांची निर्मिती येथे करण्यात आलेली असली तरी त्यासाठी आवश्यक असणाऱया डॉक्टर्सची मात्र येथे वानवा आहे. दरम्यान, गेल्या काही दिवसांपासून रुग्णालयात जाणाऱया सर्वानाच मास्कची सक्ती मात्र करण्यात आली आहे. यासंदर्भातील राज्य शासनाचे धोरण अद्याप पूर्वीइतके काटेकोर नसल्याचे दिसून आले आहे.