दापोली प्रतिनिधी
तालुक्यातील मुरुड येथील सीआरझेडचे उलंघन करून बांधकाम केल्याप्रकरणी चर्चेत असणाऱ्या व पाडण्याचे आदेश झालेल्या पुष्कर मुळे यांच्या नावे असणाऱया सी कोंच रिसॉर्ट पाडण्याच्या कामाला मंगळवारी प्रतिकात्मक सुरुवात करण्यात आली.
तत्कालीन पालकमंत्री अनिल परब यांनी मुरुड येथे साई रिसॉर्ट व सी कोंच रिसॉर्ट बांधले असल्याचा आरोप भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या यांनी वेळोवेळी केला आहे. राज्यात सत्तांतर झाल्यानंतर शिंदे सरकारने हा रिसॉर्ट पाडण्याबाबत कारवाई सुरू केली. यानंतर सर्व प्रक्रिया पूर्ण होऊन या कारवाईचे पत्र मंगळवारी सार्वजनिक बांधकाम खात्याला प्राप्त झाले. हे बांधकाम पाडण्याचे काम यश कन्स्ट्रक्शनला देण्यात आले आहे.
सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱ्यांनी ठेकेदारासह मुरुड येथे जाऊन सी कोंचची पाहणी केली. येत्या तीन महिन्यात हा रिसॉर्ट पूर्णपणे जमीनदोस्त होईल, अशी माहिती दापोली सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांनी ‘तरुण भारत’शी बोलताना दिली.
परबांचे साई रिसॉर्ट लवकरच पडेल: सोमय्या
सी कोंच रिसॉर्ट पाडण्याचे आदेश आल्यावर भाजपचे माजी खासदार किरीट सोमय्या हे सोमवारी रात्री दापोलीत येऊन दाखल झाले होते. सार्वजनिक बांधकाम खात्याच्या अधिकाऱयांसमवेत त्यांनी मुरुड येथे जाऊन या रिसॉर्टचीदेखील पाहणी केली. शिवाय प्रतिकात्मक हातोडा तेथील एका लादीवर मारला. यावेळी माध्यमांशी बोलताना किरीट सोमय्या यांनी साई रिसॉर्ट हे अनिल परब यांचेच असून ते देखील लवकरच पडेल, असा दावा केला. यानिमित्त दापोली व मुरुड येथे मोठा पोलीस बंदोबस्त ठेवण्यात आला होता.