अँथोनी अल्बानेस यांची घोषणा, आयएनएस विक्रांतवर अल्बानेस यांना मानवंदना
अहमदाबाद / वृत्तसंस्था
भारतातील पदव्यांना ऑस्ट्रेलियातही मान्यता दिली जाईल, अशी महत्वपूर्ण घोषणा त्या देशाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानेस यांनी केली आहे. दोन्ही देशांच्या सरकारांनी दोन्ही देशांच्या शिक्षण योग्यता सूत्राला मान्यता दिली आहे. त्यामुळे भारतीय विद्यापीठांनी किंवा शिक्षणसंस्थानी दिलेल्या पदव्यांना ऑस्ट्रेलियात मानले जाईल. यामुळे भारतीय विद्यार्थ्यांची मोठी सोय होणार आहे. यामुळे ऑस्ट्रेलियात शिकणाऱया भारतीय विद्यार्थ्यांना ते भारतात परत आल्यानंतर मान्यता मिळणार आहे. तसेच भारतात शिकलेल्या विद्यार्थ्यांना ऑस्ट्रेलियात काम करायचे असेल तर भारतीय पदवी त्यांना उपयोगी पडू शकेल. सध्या ऑस्ट्रेलियात किमान 5 लाख भारतीय वास्तव्यास असून त्यांची संख्या दिवसेंदिवस वाढत आहे. त्यांना याचा लाभ होणार आहे.
गांधीनगरमध्ये शाखा
ऑस्ट्रेलियाचे डिकिन विद्यापीठ भारतात गुजरातची राजधानी गांधीनगर येथे आपली एक आंतरराष्ट्रीय शाखा उघडणार आहे. यामुळे शैक्षणिकदृष्टय़ा दोन्ही देश एकमेकांच्या अधिक जवळ येणार आहेत. दोन्ही देशांमधली पदव्या आता परस्परांच्या देशात चालणार असल्याने गुणवत्ता सिद्ध करण्यासाठी वेगळी परीक्षा किंवा चाचणी देण्याची आवश्यकता राहणार नाही. या व्यवस्थेमुळे दोन्ही देशांमधील विद्यार्थी सहजगत्या दोन्ही देशांमध्ये काम मिळवू शकतील, असे प्रतिपादन त्यांनी केले. हे एक मोठे पाऊल असल्याचे आणि दोन्ही देशांसाठी लाभदायक असल्याचे त्यांनी स्पष्ट केले. भारतीय विद्यार्थ्यांनी ही मागणी केली होती.
‘विक्रांत’वर मानवंदना

यापूर्वी मुंबईत ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अँथोनी अल्बानेस यांना आयएनएस विक्रांत’ या भारताच्या युद्धनौकेवर शानदार मानवंदना (गार्ड ऑन ऑनर) देण्यात आली. यावेळी त्यांनी या नौकेच्या कॉकपिटमध्येही काही काळ व्यतीत केला. भारताने निर्माण केलेल्या या युद्धनौकेवर आपला सन्मान करण्यात आला ही माझ्या दृष्टीने अत्यंत आनंदाची घटना आहे. ऑस्ट्रेलियाच्या प्रशांत-भारत क्षेत्रातील धोरणात आम्ही भराताला मध्यवर्ती स्थान देत आहोत. भारत हा आमच्यासाठी अत्यंत महत्वपूर्ण देश आहे. भारत आमचा एक उच्च पातळीवरचा सुरक्षा भागीदार देश आहे. हिंदी महासागर क्षेत्रात दोन्ही देश एकमेकांना सहकार्य करीत आहेत, अशी भलावण ऑस्ट्रेलियाचे पंतप्रधान अल्बानेस यांनी यावेळी केली.