मोदी सरकार महत्त्वाचा निर्णय घेण्याच्या विचारात
वृत्तसंस्था / नवी दिल्ली
पुढील काळात स्थिती अनुकूल राहिल्यास सर्वसामान्यांना पेट्रोल आणि डिझेलच्या दराप्रकरणी पुन्हा एकदा दिलासा मिळू शकतो. केंद्र सरकार इंधनावरील कर कमी करण्याचा विचार करत असल्याचे समजते. अशाप्रकारचा निर्णय घेण्यात आल्यास मे 2022 नंतर पहिल्यांदाच सरकारमुळे पेट्रोल आणि डिझेलचे दर कमी होऊ शकतात.
महागाईवर नियंत्रण मिळविण्यासाठी सरकार इंधनावरील करात कपात करू शकते. फेब्रुवारी महिन्यासाठीचा महागाई दर जारी झाल्यावरच यासंबंधीचा निर्णय घेण्यात येणार असल्याचे सूत्रांकडून सांगण्यात आले. डिसेंबर महिन्यात किरकोळ महागाई दर 5.72 टक्के राहिला होता, तर जानेवारी महिन्यात हा दर 6.52 टक्के राहिला होता. हे प्रमाण रिझर्व्ह बँकेने निर्धारित केलेल्या कक्षेपेक्षा अधिक आहे.
अन्नधान्याचा महागाई दर अधिकच राहण्याची शक्यता आहे. तर दूध अन खाद्यतेलाच्या दरातील महागाई सरकारची चिंता वाढवत आहे. याचमुळे सरकार काही अन्नधान्यांवरील आयात शुल्क कमी करण्याचा विचार करत आहे. तसेच इंधनावरील करही कमी केला जाऊ शकतो.
अलीकडच्या महिन्यांमध्ये जागतिक बाजारपेठेत कच्च्या तेलाचे दर स्थिरावले आहेत. परंतु भारतातील तेल कंपन्यांनी मागील नुकसानीची भरपाई करण्याच्या उद्देशाने या कमी झालेल्या दरांचा लाभ अद्याप ग्राहकांना मिळवून दिलेला नाही.