लक्ष विचलित करून लुटण्याच्या प्रकारात वाढ : गुन्हेगारांमुळे बेळगाव पोलिसांची डोकेदुखी, जनतेने सावधगिरी बाळगणे आवश्यक
प्रतिनिधी /बेळगाव
कर्नाटक विधिमंडळाचे हिवाळी अधिवेशन 19 डिसेंबरपासून होणार आहे. या पार्श्वभूमीवर पोलीस यंत्रणा अधिवेशन बंदोबस्ताच्या तयारीत गुंतली आहे. अशा परिस्थितीतच बेळगाव शहर व उपनगरात गुन्हेगारांनी धुमाकूळ घातला आहे. चोऱ्या, घरफोड्यांचे सत्र सुरू आहेच, त्यातच लक्ष विचलित करून वृद्धांना लुटणाऱ्या भामट्यांची टोळीही सक्रिय झाल्याचे सामोरे आले आहे.
बुधवार दि. 30 नोव्हेंबर रोजी सकाळी वैभवनगर येथे जट्ट्याप्पा गोरनाळ (वय 72) या वृद्धाला गाठून दोघा भामट्यांनी तीन तोळ्यांचे दागिने पळविले आहेत. आपण गुन्हे तपास विभागाचे पोलीस आहोत. या परिसरात तस्करी सुरू आहे. तपासासाठी येथे आलो आहोत, असे सांगत जट्ट्याप्पा यांच्या अंगावरील तीन तोळ्यांचे दागिने त्यांच्याच ऊमालात बांधून त्यांच्या हाती देण्यात आले. थोड्या वेळात जट्ट्याप्पा यांनी ऊमालाची गाठ सोडली, त्यावेळी त्यामध्ये दागिने नव्हते.
यापूर्वी बेळगावात घडलेल्या अशा घटना लक्षात घेता लक्ष विचलित करून वृद्धांना टार्गेट करण्यात इराणी टोळीतील गुन्हेगार आघाडीवर आहेत, हे निष्पˆ झाले आहे. केवळ बेळगावच नव्हे तर निपाणी, हुबळी-धारवाडसह उत्तर कर्नाटकातील अनेक शहरात अशा घटना घडल्या आहेत. यावरून इराणी टोळीतील गुन्हेगार पुन्हा सक्रिय झाले आहेत, असा संशय बळावला आहे.
सात वर्षांपूर्वी बेळगावात इराणी गुन्हेगारांनी अक्षरश: धुडगूस घातला होता. इतर गुन्हेगारांपेक्षा त्यांची कार्यपद्धत वेगळी आहे. मोटारसायकलवरून सुसाट वेगाने येऊन महिलांच्या गळ्यातील दागिने पळविण्यात या टोळीतील गुन्हेगारांचा हातखंडा आहे. लक्ष विचलित करून महिला व वृद्धांना लुटण्यातही हे गुन्हेगार आघाडीवर असतात. त्यामुळेच पुन्हा इराणी टोळीतील गुन्हेगारांचा वावर सुरू झाल्याचा संशय बळावला आहे.
लक्ष विचलित करून दागिने पळविताना खास करून ज्येष्ठ नागरिकांना लक्ष्य बनविण्यात येते. पायी चालत जाणाऱ्या किंवा दुचाकीवरून जाणाऱ्या वृद्ध व्यक्तीला गाठून आपण पोलीस आहोत, पुढे खून झाला आहे, दागिने सांभाळा’ असा मानभावीपणाचा सल्ला देत दागिने ऊमालात बांधून देण्याचे सांगत हातचलाखीने पळविले जातात. ऊमालाची गाठ सोडून पाहिल्यानंतर त्यामध्ये दागिन्यांऐवजी दगड आढळतात. दगड बांधून संबंधित वृद्ध व्यक्तीच्या हातात ते देतात. हातचलाखीने दागिने आपल्या खिशात टाकतात. भामटे तेथून निघून जाईपर्यंत हे उघडकीस येत नाही.
सात वर्षांपूर्वी सकाळी आपल्या घरासमोर झाडलोट करणाऱ्या महिलांना बोलते करून त्यांना आपल्या खिशातील एक चिठ्ठी दाखवत आणि अमूक नावाची व्यक्ती कुठे असते? असा पत्ता विचारण्याच्या बहाण्याने सकाळी सडासंमार्जन करणाऱ्या महिलांच्या गळ्यातील दागिने हिसकावून घेऊन पलायन करण्याचे प्रकार वाढले होते. खासकरून माळमाऊती, एपीएमसी, उद्यमबाग, टिळकवाडी या उपनगरातील पोलीस स्थानकांच्या क्षेत्रात या घटना वाढल्या होत्या.
पोलीस दलाविऊद्ध लोक रस्त्यावर उतरले होते. 4 एप्रिल 2015 रोजी तत्कालीन पालकमंत्री सतीश जारकीहोळी यांनी या घटनांची गंभीर दखल घेत वरिष्ठ पोलीस अधिकाऱ्यांची बैठक घेऊन त्यांची झाडाझडती घेतली होती. लगेच दुसऱ्या दिवशी 5 एप्रिल 2015 रोजी इराणी टोळीतील सलीम शेरअली शेख (वय 30) याला पकडण्यात आले होते.
काही वर्षे गुन्हेगारांनी बेळगावकडे फिरविली होती पाठ
माळमाऊतीचे तत्कालीन पोलीस उपनिरीक्षक बी. आर. ग•sकर यांच्यावर हल्ला करून पलायन करताना प्रत्युत्तरादाखल त्यांनी केलेल्या गोळीबारात सलीम जखमी झाला होता. त्यानंतर पुणे, मुंबई, अहमदनगर परिसरात जाऊन इराणी टोळीतील गुन्हेगारांची धरपकड करण्यात आली होती. त्यानंतर काही वर्षे इराणी टोळीतील गुन्हेगारांनी बेळगावकडे पाठ फिरविली होती. एक-दोन वर्षांत पुन्हा चेनस्नॅचिंग, लक्ष विचलित करून वृद्धांना लुटण्याचे प्रकार सुरू झाले आहेत. हे गुन्हेगार बेळगाव पोलिसांसाठी डोकेदुखीचे ठरले आहेत.
बुधवारी वैभवनगर येथे ज्या वृद्धाला लुटण्यात आले ते सुशिक्षित आहेत. चांगल्या कंपनीतून मोठ्या पदावर काम करून निवृत्त झालेले आहेत. म्हणून त्यांनी आपल्याला गाठलेल्या भामट्याला ओळखपत्र विचारले. ‘तू पोलीसच आहेस, हे कशावरून?’ असे म्हणताच त्याने आपले ओळखपत्रही दाखविले. त्यावरून इराणी टोळीतील गुन्हेगार सर्व तयारीनिशी मैदानात उतरत असल्याचे अधोरेखित झाले आहे. म्हणून त्यांची धरपकड करणे मोठे जिकिरीचे काम ठरते.
चोरीच्या मोटारसायकलींचा वापर
चेनस्नॅचिंग किंवा लक्ष विचलित करून वृद्धांच्या अंगावरील दागिने पळविण्यासाठी हे गुन्हेगार चोरीच्या मोटारसायकलींचा वापर करतात. धारवाडमधून मोटारसायकल चोरून बेळगावला गुन्हे करण्यासाठी येताना पुणे-बेंगळूर राष्ट्रीय महामार्गावरील कित्तूरजवळ अपघातात एका गुन्हेगाराचा मृत्यूही झाला होता. मोटारसायकली चोरणारे वेगळे असतात तर प्रत्यक्षात लुटणारे गुन्हेगार वेगळे असतात. खासकरून अहमदनगर जिल्ह्यातील श्र्रीरामपूर, पुणे येथील गुन्हेगार वेगवेगळ्या राज्यात गुन्हे करतात. अनेकवेळा आपल्या वाहनावर ‘प्रेस’ लिहून ते पोलिसांची दिशाभूल करतात. इराणी टोळीतील सहाजणांना 12 ऑगस्ट 2016 रोजी जन्मठेपेची शिक्षाही झाली आहे.
लक्ष विचलित करण्याच्या पद्धती
‘अटेंशन डायव्हर्शन’ (लक्ष विचलित करणे) म्हणजे हे गुन्हेगार नेमके काय करतात? यासाठी ते कोणते हातखंडे आजमावतात तेही पाहूया. बँकेतून मोठी रक्कम काढून बाहेर पडणाऱ्याच्या अंगावर घाण, खायखुजली टाकून त्याच्याजवळील पैसे लांबवतात. जर एखादी व्यक्ती कारमध्ये बसली असेल तर कारच्या समोर एक-दोन नोटा टाकून ‘साहेब, या नोटा तुमच्याच आहेत का?’ अशी विचारणा करीत प्रामाणिकपणाचा आव आणून कारमधील बॅग पळवितात. पत्ता विचारण्याच्या बहाण्याने, पोलीस, सीआयडी, क्राईम ब्रँचचे अधिकारी असल्याची बतावणी करूनही दागिने, रोकड पळविण्यात या गुन्हेगारांचा हातखंडा आहे.