रस्ते खराब झाल्याने खडी बाहेर तर धूळीचे प्रचंड लोट : चालकांची खडे चुकवताना कसरत, धूळीने प्रवासी हैराण
बाळासाहेब उबाळे/कोल्हापूर
पावसाने सर्वच रस्त्यांचे निकृष्ट काम उघडय़ावर आणले आहे. कोल्हापुरातील मध्यवर्ती बसस्थानकाच्या (सीबीएस) आवारात सुद्धा सर्वत्र खड्डे पडले आहेत. बसच्या रहदारीमुळे याठिकाणी धुळीचे लोट निर्माण होत आहेत. यामुळे प्रवासी हैराण होत आहेत. काही मिनिटातच प्रवाशांचे सर्वांग धूळीने माखले जात आहे.
कोल्हापूर मध्यवर्ती बसस्थानकाचा परिसर नेहमी गजबजलेला असतो. स्थानकात रोज शेकडो एसटी बसेस येतात आणि जातात. बसेसच्या रहदारीमुळे स्थानकाच्या आत आणि बाहेरील रस्त्यावर सुध्दा प्रचंड धूळ निर्माण होत आहे. पावसाने शहरातील रस्त्यांची धूळदाण झाली आहे. डांबर धुवून जाऊन फक्त खडी शिल्लक राहिली असून ती वर आली आहे. त्याप्रमाणे मध्यवर्ती बसस्थानकातही डांबर जावून फक्त खडी आणि माती राहिली आहे.
स्थानकातील सर्व परिसरात खड्डे पडले आहेत. यामुळे चालकांना बस चालवताना कसरत करावी लागत आहे. बहुतेक वेळा बस खड्डय़ातून बाहेर काढताना ऍक्सीलेटरवर दाब द्यावा लागत असल्याने सायलन्सरमधून बाहेर पडणाऱया हवेमुळे धूळीचे लोट उठत आहेत. ही धूळ स्थानकात बसच्या प्रतीक्षेत थांबलेल्या प्रवाशांच्या नाका-तोंडातून जात आहे. तर काही वेळ याठिकाणी थांबल्यास संपूर्ण शरीर धूळीने माखले जात आहे. उडणाऱया धूळीमुळे श्वसनावरही परिणाम होत आहे.
डांबरीकरणाची आवश्यकता
बसस्थानकात पाच वर्षापूर्वी डांबरीकरण करण्यात आले. त्यानंतर पुन्हा डांबरीकरण झाले नाही. यंदा ऑक्टोबर महिन्यापर्यंत लांबलेल्या पावसाने येथे खड्डे पडले आहेत. यामुळे स्थानकात लवकर डांबरीकरण करण्याची गरज आहे.
खाद्यपदार्थावर धूळ
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात खाद्यपदार्थांच्या स्टॉलची संख्या मोठी आहे. बहुतांश स्टॉलवर तेलात तळलेले पदार्थ असतात. रात्रीच्या वेळी तर हा परिसर स्टॉलने फुललेला असतो. पण येथे उडणारी धूळ खाद्यपदार्थांवरही जात आहे.
2014 नंतर डांबरीकरण नाही
मध्यवर्ती बसस्थानक परिसरात ज्या ठिकाणी बसेस थांबतात त्या परिसरात तीन वर्षातून डांबरीकरण केले जाते.यापूर्वी 2014 साली येथे डांबरीकरण करण्यात आले होते. दरम्यान कोरोना आणि संपात काही वर्षे गेल्याने या कामाकडे प्रशासनाचे पूर्ण दुर्लक्ष झाले. यंदाच्या पावसात तर सर्वच रस्त्यांची दयनीय अवस्था झाली.
लवकरच डांबरीकरण
पावसामुळे मध्यवर्ती बसस्थानकाच्या आवारातील रस्ता खराब होऊन खडी वर आली आहे. धूळही निर्माण होत आहे. लवकरच स्थानकाच्या आवारात डांबरीकरण करण्यात येणार आहे. सद्या खड्डे मुजवण्याचे काम सुरु आहे. – अनघा बारटक्के, विभाग नियंत्रक, कोल्हापूर विभाग