वृत्तसंस्था/ दुबई
आयसीसीच्या कसोटी फलंदाजांच्या ताज्या मानांकन यादीत भारतीय संघाचा कर्णधार रोहित शर्माने नवव्या स्थानावर झेप घेतली आहे. तर पाकचा कर्णधार बाबर आझमने वरच्या स्थानावर उडी घेतली आहे.
या ताज्या मानांकन यादीकरिता नुकत्याच झालेल्या ऑस्ट्रेलिया, इंग्लंड आणि भारत यांच्या कसोटी सामन्यातील खेळाडूंची कामगिरी विचारात घेण्यात आली. पाकचा कर्णधार बाबर आझमने ऑस्ट्रेलियाविरुद्धच्या कसोटी सामन्यात 78 आणि 54 धावांच्या खेळी केल्याने त्याने ऑस्ट्रेलियाच्या स्टीव्ह स्मिथला मागे टाकले. ऑस्ट्रेलियाने अलीकडेच पहिल्या कसोटीत दक्षिण आफ्रिकेचा केवळ दोन दिवसात पराभव केला. या सामन्यात स्टीव स्थिने 36 आणि 6 धावा जमवल्या होत्या. पाकचा कर्णधार बाबर आझमने वनडे क्रिकेट फलंदाजांच्या मानांकन यादीत पहिल्या तर टी-20 मानांकन यादीत चौथ्या स्थानावर आहे. पण कसोटी फलंदाजांच्या यादीत बाबर आझम दुसऱया स्थानावर असून ऑस्ट्रेलियाचा लाबुशेन पहिल्या स्थानावर आहे. लाबुशेनने बाबर आझमपेक्षा 61 गुण अधिक मिळवले आहेत.
कसोटी गोलंदाजांच्या मानांकन यादीत भारताचे फिरकी गोलंदाज कुलदीप यादव आणि अक्षर पटेल यांनी प्रगती केली आहे. बांगलादेशविरुद्ध नुकत्याच झालेल्या पहिल्या कसोटीत कुलदीप यादवने सामनावीराचा पुरस्कार मिळवला असून आता तो या मानांकन यादीत 49 व्या स्थानावर आहे. तसेच अक्षर पटेल 18 व्या स्थानावर आहे. ऑस्ट्रेलियाचा फलंदाज हेडने फलंदाजांच्या मानांकनात 800 मानांकन गुणाचा टप्पा ओलांडत चौथे स्थान मिळवले आहे. भारताचा चेतेश्वर पुजारा 16 व्या, श्रेयस अय्यर 26 व्या तर शुभमन गिल 54 व्या स्थानावर आहे.
कसोटी गोलंदाजांच्या मानांकनात दक्षिण आफ्रिकेच्या रबाडाने तिसऱया स्थानावर झेप घेतली आहे. इंग्लंडचा कर्णधार बेन स्टोक्स 23 व्या, दक्षिण आफ्रिकेचा बेहुमा 24 व्या, बांगलादेशचा शकीब अल हसन 37 व्या स्थानावर आहे. आयसीसीच्या कसोटी चॅम्पियनशिप स्पर्धेच्या गुणतक्त्यात ऑस्ट्रेलियाने आपले अग्रस्थान अधिक भक्कम केले असून भारत आता दुसऱया स्थानावर आहे.