5 धावांनी विजय मिळविणाऱया बांगलादेशचा मालिकाविजय, मिराज सामनावीर
वृत्तसंस्था/ मिरपूर
क्षेत्ररक्षण करताना अंगठा व तर्जनीला दुखापत झालेला भारतीय कर्णधार रोहित शर्माने झुंजार फलंदाजी केल्यानंतरही भारताला येथे झालेल्या दुसऱया वनडे सामन्यात यजमान बांगलादेशकडून 5 धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. या विजयामुळे बांगलादेशने 2-0 अशी आघाडी घेत मायदेशात भारताविरुद्ध झालेली सलग दुसरी द्विदेशीय मालिका जिंकली. यापूर्वी 2015 मधील मालिकेत त्यांनी भारतावर 2-1 असा मालिकाविजय मिळविला होता. अष्टपैलू कामगिरी करणाऱया मेहदी हसन मिराजला येथे सामनावीराचा पुरस्कार मिळाला. त्याने नाबाद 100 धावा व 2 बळी मिळविले.
प्रथम फलंदाजी स्वीकारलेल्या बांगलादेशची स्थिती 19 व्या षटकांत 6 बाद 69 अशी झाली होती. त्यानंतर पहिल्या सामन्यातील हिरो मेहदी हसन मिराज व मेहमुदुल्लाह यांनी सातव्या गडय़ासाठी 148 धावांची भागीदारी केल्याने बांगलादेशला निर्धारित 50 षटकांत 7 बाद 271 अशी आव्हानात्मक धावसंख्या उभारता आली. त्यानंतर खराब सुरुवात झाल्यानंतर भारताची स्थितीही 19 व्या षटकांत 4 बाद 65 अशी झाली होती. श्रेयस अय्यरने अक्षर पटेलसमवेत पाचव्या गडय़ासाठी 107 धावांची शतकी भागीदारी करून भारताचे आव्हान जिवंत ठेवले. पण तो बाद झाल्यानंतर अक्षर पटेलही 58 धावा काढून बाद झाला. 7 बाद 207 अशा स्थितीनंतर भारताच्या विजयाच्या आशा संपुष्टातच आल्या होत्या. पण शार्दुल ठाकुर बाद झाल्यानंतर नवव्या क्रमांकावर फलंदाजीस आलेला कर्णधार रोहित शर्माने दीपक चहर, सिराज यांच्या साथीने झुंजार खेळ करीत संघाला विजयासमीप आणले. पण शेवटच्या चेंडूवर त्याला षटकार मारण्यात यश आले नाही आणि भारताला 5 धावांनी निसटता पराभव स्वीकारावा लागला. भारताने 9 बाद 266 धावांपर्यंतच मजल मारली.
272 धावांचा पाठलाग करताना सलामीवीर कोहली (5) व धवन (8) लवकर बाद झाले. त्यानंतर श्रेयसने सूत्रे घेत संघाला अडचणीतून बाहेर काढताना 82 धावांची खेळी केली आणि अक्षर पटेलसमवेत शतकी भागीदारीही नोंदवली. श्रेयसने 102 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार मारले तर पटेलने 56 चेंडूत 2 चौकार, 3 षटकारांसह 56 धावा फटकावल्या. जखमी असूनही फलंदाजीस आलेल्या रेहित शर्माने केवळ 28 चेंडूत 3 चौकार, 5 षटकारांच्या मदतीने नाबाद 51 धावा झोडपल्या. पण तो संघाला विजय मिळवून देऊ शकला नाही. बांगलादेशचा इबादत हुसेन सर्वात यशस्वी गोलंदाज ठरला. त्याने 45 धावांत 3, मेहदी हसन मिराज व शकीब अल हसन यांनी प्रत्येकी 2 तर मुस्तफिजूर रहमान व मेहमुदुल्लाह यांनी एकेक बळी मिळविले.
तत्पूर्वी, बांगलादेशच्या डावात अनामुल हक (11), कर्णधार लिटॉन दास (23 चेंडूत 7), नजमुल हुसेन शांतो (35 चेंडूत 21), शकीब हसन (20 चेंडूत 8), मुश्फिकूर रहीम (24 चेंडूत 12), अफिफ हुसेन (0) लवकर बाद झाल्याने त्यांची स्थिती बिकट बनली होती. पण मेहमुदुल्लाह व मेहदी हसन मिराज यांनी दमदार फलंदाजी करून सामन्याचे चित्र पालटले. दोघांनी जवळपास दीडशतकी भागीदारी करीत संघाला मजबूत स्थिती प्राप्त करून दिली. मेहमुदुल्लाहने 96 चेंडूत 7 चौकारांसह 77 धावा केल्या तर मेहदी हसन मिराजने नाबाद 100 धावा फटकावत पहिले वनडे शतक नोंदवले. त्याने 83 चेंडूंच्या खेळीत 8 चौकार, 4 षटकार मारले. नसुम अहमदसह (नाबाद 18) त्याने आठव्या गडय़ासाठी 54 धावांची अभेद्य भागीदारी करीत 271 धावांची मजल मारून दिली. वॉशिंग्टन सुंदरने 37 धावांत 3, सिराज व उमरान मलिक यांनी प्रत्येकी 2 बळी मिळविले.
या मालिकेतील शेवटचा सामना शनिवारी 10 डिसेंबर रोजी होणार आहे. रोहित शर्माला जखम झालेल्या ठिकाणी टाके घालण्यात आले असून तो तिसऱया सामन्यात व त्यानंतर होणाऱया पहिल्या कसोटीसाठी उपलब्ध होण्याची शक्यता कमी आहे, असे सांगण्यात आले.
संक्षिप्त धावफलक ः बांगलोदश 50 षटकांत 7 बाद 271 ः अनामुल हक 11, नजमुल हुसेन शांतो 21, रहीम 12, मेहमुदुल्लाह 77 (96 चेंडूत 7 चौकार), मेहदी हसन मिराज नाबाद 100 (83 चेंडूत 8 चौकार, 4 षटकार), नसुम अहमद नाबाद 18 (11 चेंडूत 2 चौकार, 1 षटकार), अवांतर 17. गोलंदाजी ः सुंदर 3-37, उमरान 2-58, सिराज 2-73).
भारत ः 50 षटकांत 9 बाद 266 ः कोहली 5, धवन 8, सुंदर 11, केएल राहुल 14, श्रेयस अय्यर 82 (102 चेंडूत 6 चौकार, 3 षटकार), अक्षर पटेल 56 (56 चेंडूत 2 चौकार, 3 षटकार), ठाकुर 7, दीपक चहर 11, रोहित शर्मा नाबाद 51 (28 चेंडूत 3 चौकार, 5 षटकार), अवांतर 19. गोलंदाजी ः इबादत हुसेन 3-45, मिराज 2-46, शकीब हसन 2-39, मेहमुदुल्लाह 1-33, मुस्तफिजूर 1-43.