साकारणार विशेष भूमिका
दिग्ग्ज अभिनेता नसीरुद्दीन शाह हे ‘मिनिमम’ या चित्रपटात अनोखी भूमिका साकारताना दिसून येणार आहेत. या चित्रपटात सबा आझाद, गीतांजली कुलकर्णी, नमित दास आणि रुमाना मोल्ला हे कलाकार देखील आहेत. या चित्रपटाचे दिग्दर्शन रुमानानेच केले आहे.
हा चित्रपट विवाह, प्रवासावेळी होणारे प्रेम, स्नेह आणि मैत्रीचे बंध उलगडणारी कहाणी घेऊन आला आहे. बेल्जियमची रुमाना ही यापूर्वी नसीरुद्दीन शाह यांच्यासोबत राष्ट्रीय पुरस्कार विजेता चित्रपट ’इरादा’मध्ये दिसून आली आहे. या चित्रपटासाठी मोठी मेहनत करण्यात आली आहे. हा चित्रपट तयार करण्यासाठी केलेली मेहनत यशस्वी ठरल्याचे उद्गार रुमानाने काढले आहेत.
नसीरुद्दीन यांच्यासोबत चित्रिकरण करणे प्रत्यक्षात एक स्वप्न साकार होण्यासारखे होते असे तिने म्हटले आहे. प्लाटून वन फिल्म्स आणि एलानार फिल्म्सचे शिलादित्य बोरा आणि राधिका लवू यांच्याकडून निर्मित या चित्रपटाचे चित्रिकरण बेल्जियम, सर्बिया आणि भारतातील विविध ठिकाणी करण्यात आले आहे. पुढील वर्षाच्या प्रारंभी हा चित्रपट प्रदर्शित होणार आहे.