मराठीसाठी प्रवीण बांदेकर यांचा तर कोकणीसाठी माया खरंगटे यांचा गौरव
वृत्तसंस्था/ नवी दिल्ली
साहित्य महोत्सवाला शनिवारपासून प्रारंभ झाला असून येथील कमानी सभागृहात आयोजित कार्यक्रमात भारतीय भाषांमधील 24 लेखकांना साहित्य अकादमी पुरस्कार 2022 ने सन्मानित करण्यात आले. यामध्ये मराठीसाठी प्रवीण बांदेकर, कोंकणीसाठी माया अनिल खरंगटे, हिंदीसाठी बद्री नारायण आणि इंग्रजीसाठी अनुराधा रॉय यांचा समावेश आहे.
केंद्रीय सांस्कृतिक राज्यमंत्री अर्जुन राम मेघवाल यांच्या उपस्थितीत पुरस्कार सोहळा संपन्न झाला. आपल्या देशाला विकसनशील राष्ट्राऐवजी विकसित राष्ट्राची बिऊदावली मिळण्याच्यादृष्टीने साहित्यिकांनी समाजात सकारात्मकता निर्माण करावी, असे आवाहन मेघवाल यांनी केले. आपल्या देशात होऊन गेलेले संत हे केवळ कवी नव्हते तर महान विचार आणि व्यापक दृष्टी असलेले साहित्यिक होते. त्यांनी आपल्याला निसर्गावर प्रेम करायला शिकवले, असेही ते म्हणाले.
कमानी सभागृहात आयोजित साहित्य अकादमी पुरस्कार 2022 सादरीकरण सोहळ्यापूर्वी रवींद्र भवन प्रांगणात युवा साहित्य, बहुभाषिक कवी संमेलन, अस्मिता, बहुभाषिक कथा-वाचन आदी कार्यक्रमांचे आयोजन करण्यात आले होते. यामध्ये विविध भारतीय भाषांमधील प्रख्यात लेखक-साहित्यिकांनी सादरीकरण केले.