जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांची माहिती
प्रत्येकी 5 हजारांचे मानधन खात्यावर जमा
कोल्हापूर प्रतिनिधी
देशात कोरोना विषाणूचा प्रादुर्भाव झाल्याने संपूर्ण राज्यासह देशात लॉक डाऊन लागू होता. लॉकडाऊन शिथिल करण्यात आल्यानंतरही सांस्कृतिक कार्यक्रमाचे आयोजन नाटय़गृहे, चित्रपटगृहे यांच्यावर बंदी असल्याने कलाकारांना सुमारे दीड वर्षापर्यंत कला सादरीकरण व त्यातून होणारे उत्पन्न यापासून वंचित राहावे लागले होते .त्यामुळे अशा कलाकारांना आर्थिक सहाय्य म्हणून रुपये पाच हजार प्रमाणे सानुग्रह अनुदान देण्यासाठी शासनाने कलाकारांचे अर्जांची मागणी करण्यात आली होती. त्यानुसार सांस्कृतिक खात्याने जिह्यातील 280 एकल कलाकारांच्या खात्यावर प्रत्येकी 5 हजार रूपये जमा केले आहेत, अशी माहिती जिल्हाधिकारी राहूल रेखावार यांनी दिली.
कलाकारांनी सादर केलेल्या अर्जातून जिल्हास्तरीय एकल कलाकार निवड समितीने कोल्हापूर जिह्यातून 280 पात्र एकल कलाकारांची निवड करून सांस्कृतिक कार्य विभागास 31 मार्च 22 रोजी कळविण्यात आली होती. त्यानुसार 25 जुलै 2022 रोजी सांस्कृतिक खात्याने या सर्व कलाकारांच्या खात्यावर प्रत्येकी रुपये पाच हजार जमा केले आहेत. निवड झालेल्या ज्या कलाकारांच्या खात्यावर अद्याप रक्कम जमा झाली नसल्यास त्या कलाकारांनी त्वरित समाज कल्याण विभाग ,जिल्हा परिषद कोल्हापूर या कार्यालयाशी संपर्क करावा असे आवाहन जिल्हाधिकारी राहुल रेखावार यांनी केले आहे.