व्हेंटिलेटवर असल्याची माहिती ः गळय़ासह डोळय़ाला गंभीर इजा
न्यूयॉर्क / वृत्तसंस्था
अमेरिकेमध्ये एका कार्यक्रमादरम्यानच्या प्राणघातक हल्ल्यानंतर गंभीर जखमी झालेले भारतीय वंशाचे अमेरिकन लेखक सलमान रश्दी हे सध्या व्हेंटिलेटरवर आहेत. त्यांची प्रकृती चिंताजनक असल्याचे सांगण्यात येत आहे. सध्या ते अजिबात बोलू शकत नाहीत. चाकूहल्ल्यामुळे त्यांच्या गळय़ाला गंभीर इजा झाली असून डोळय़ालाही दुखापत झाली आहे. डोळय़ाला झालेल्या जखमेमुळे ते एका बाजूची दृष्टी गमावू शकतात. त्यांच्या यकृतालाही गंभीर दुखापत झाली आहे. यासोबतच हाताच्या रक्तवाहिन्याही कापण्यात आल्याचे वैद्यकीय सूत्रांनी सांगितले.
रश्दी यांच्यावर शुक्रवारी 24 वषीय हादी मातर याने एका कार्यक्रमादरम्यान हल्ला केला होता. मातरने त्यांच्या गळय़ासह इतरत्र 10-15 वार केले होते. या जीवघेण्या हल्यानंतर रश्दी यांना एअर-लिफ्ट करून रुग्णालयात दाखल करण्यात आले होते. रश्दींच्या गळय़ाला आणि पोटावर चाकूने अनेक जखमा करण्यात आल्या असून त्यांच्यावर नुकतीच शस्त्रक्रिया पूर्ण झाल्याची माहिती रुग्णालयातील एका डॉक्टरने अमेरिकन मीडियाला दिली होती.
33 वर्षांपूर्वी इराणच्या धार्मिक नेत्याने फतवा जारी करून मुस्लीम परंपरांवर लिहिलेल्या ‘द सॅटॅनिक व्हर्सेस’ या कादंबरीवरून सलमान रश्दी वादात सापडले होते. इराणचे धार्मिक नेते अयातुल्ला खोमेनी यांनी 1989 मध्ये त्यांच्याविरोधात फतवा काढला होता. या हल्ल्याला त्यांच्याशी जोडले जात आहे.