सांगली : भारतीय ध्वजाप्रमाणे तीन रंगांच्या फुलांनी सजलेला भारताचा नकाशा, भारतमाता, तसेच वेगवेगळ्या रंगातील एकापेक्षा एक सुरेख गुलाब, पुष्परचना, फुलांच्या रांगोळ्या, विविध प्रकारच्या फुलांची रोपे, कुंड्या आदी भरगच्च फुलांसंबंधित विविध साहित्यांनी नटलेले मराठा समाज भवन म्हणजे जणू फुलांची अखंड बागच अवतरल्याचाच भास होत आहे. निमित्त आहे, ४४ व्या पुष्परचना स्पर्धेचे व पुष्पप्रदर्शनाचे.

येथील दि सांगली रोझ सोसायटी व मराठा समाज यांच्यावतीने मराठा समाज येथे आयोजित गुलाबपुष्प प्रदर्शन व पुष्परचना स्पर्धेचे उद्घाटन आयुक्त सुनिल पवार व त्यांच्या सुविद्य पत्नी सुषमा पवार यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी पवार म्हणाले, भारतीय स्वातंत्र्याचा व मराठा समाज भवनचा अमृत महोत्सव असल्याने हा दुग्ध शर्करा योगच आहे. महाविद्यालयात माझा अँग्रीकल्चर विषय असल्याने हे प्रदर्शन पाहून कॉलेजचे दिवस आठवले. फुलांसारखे आपणही दुसऱ्यांना सुखी करण्यासाठी काहीतरी दिले पाहिजे. प्रत्येकास दु:ख असते, ही फुले पाहिल्यावर ते दु:ख विसरले जाते. सांगलीतही खुप काटे, संकटे आहेत. त्यामुळे मलाही गुलाबाच्या फुलांप्रमाणे काट्यात राहून काम केले पाहिजे. सर्वांनी जातीपातीत न अडकता एक होत पर्यावरणाचे काम करावे, तरच देशाची प्रगती होईल, अशी भावना त्यांनी व्यक्त केली