जोकोविच विजयी, अँडी मरेची वाटचाल संपुष्टात, भारताच्या श्रीराम बालाजी-जीवन जोडीचीही सरशी
वृत्तसंस्था/ मेलबॉर्न
ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये नोव्हाक जोकोविचने धोंडशिरेसाठी दोनदा उपचार करण्याची गरज भासूनही ग्रिगोर दिमित्रोव्हचा 7-6 (7), 6-3, 6-4 असा पराभव करून तिसरी फेरी सहज जिंकली. मात्र दुसरीकडे, अनुभवी अँडी मरेची स्पर्धेतील वाटचाल संपुष्टात आली आहे. सानिया मिर्झाने दोन्ही गटांत विजय नोंदविलेला असून बाकीच्या भारतीय खेळाडूंसाठीही शनिवारचा स्पर्धेचा सहावा दिवस विजयाचे दर्शन घडविणारा ठरला आहे.
पहिला सेट टायब्र्रेकमध्ये गेल्यानंतर जोकोविचला आपल्या सर्वोत्तम खेळाचे प्रदर्शन घडवावे लागले. 20 फटक्यांचा समावेश राहिलेल्या अनेक रॅलींनंतर हा सेट त्याने जिंकला. तिथून त्याने मागे वळून पाहिले नाही आणि बल्गेरियन प्रतिस्पर्ध्याला फारसा प्रतिकार करू न देता सामना जिंकला. असे असले, तरी जोकोविचसाठी धोंडशीर ही चिंतेची कारण बनली आहे, कारण तो पुढील सामन्यात स्थानिक टेनिसप्रेमींच्या आवडत्या आलेक्स डी मिनौरशी लढणार आहे. आलेक्स डी मिनौरने बेंजामिन बोन्झीला 7-6, 6-2, 6-1 असे पराभूत केले.

अन्य सामन्यांत अँडी मरेची उल्लेखनीय धाव आणखी एका तीन तासांहून जास्त चालेल्या सामन्यानंतर संपुष्टात आली. अनुभवी स्पॅनिश खेळाडू रॉबर्टो बौटिस्टा अगुटने त्याला 6-1, 6-7 (7), 6-3, 6-4 असे पराभूत केले. पहिल्या सेटमध्ये मरेचा खेळ विस्कटलेले दिसला आणि दुसऱ्या सेटमध्ये त्याने उसळी घेतली होती. पण बौटिस्टा अगुटने आपल्या अनुभवाचा उपयोग करत मरेला पुन्हा बाजी मारू दिली नाही.
महिलांच्या गटात आर्यना साबालेन्का हिने तिचा उल्लेखनीय फॉर्म चालू ठेवताना एलिस मर्टेन्सचा 6-2, 6-3 असा सरळ सेट्समध्ये विजय मिळविला. एकही सेट न गमावता साबालेन्काने यंदा नऊ सामन्यांत विजय मिळवले असून पुढील सामन्यात तिची बेलिंडा बेन्सिचविऊद्ध कसोटी लागणार आहे. बेन्सिचने कामिला जॉर्जी हिला 6-2, 7-5 असे नमवले. चतुर्थ मानांकित आणि डब्ल्यूटीए फायनल्सची विजेती पॅरोलिन गार्सियने संथ सुऊवातीनंतर 1-6, 6-3, 6-3 अशा फरकाने जर्मनीच्या लॉरा सिग्मंडविऊद्ध विजय मिळवून पुढील फेरीत प्रवेश केला आहे.
सानिया-बोपण्णाची चांगली सुरुवात
सानिया मिर्झाने तिच्या अंतिम ग्रँड स्लॅम स्पर्धेमध्ये मिश्र्र दुहेरी व दुहेरी गटांत विजयी सुऊवात केली आहे. तिने मिश्र दुहेरीत रोहन बोपण्णासमवेत पहिल्या फेरीतील लढतीत ऑस्ट्रेलियन जोडी जॅमी फोरलिस आणि ल्यूक सॅव्हिल यांचा 7-5, 6-3 असा पराभव केला. लढतीच्या सुरुवातीलाच सर्व्हिस गमवावी लागूनही त्यांनी हा विजय नोंदविला. मिर्झाने कझाकची जोडीदार अॅना डालनिना हिच्यासोबत महिला दुहेरीची देखील दुसरी फेरी गाठली आहे. त्यांनी दाल्मा गाल्फी व बेर्नार्ड पेरा या जोडीवर 6-2, 7-5 असा विजय मिळविला.
श्रीराम बालाजी-जीवन नेदुनचेझियान या जोडीने देखील विजयी सुरुवात करताना पाचव्या मानांकित इव्हान दोडिग आणि ऑस्टिन क्रॅजिसेक जोडीचा 7-6 (6), 2-6, 6-4 असा पराभव केला. पुण्यातील ‘एटीपी 250’ स्पर्धेत उपविजेते ठरल्यामुळेत्यांच्या क्रमवारीत लक्षणीय सुधारणा झाल्याने या जोडीला ऑस्ट्रेलियन ओपनमध्ये प्रवेश मिळालेला आहे. कनिष्ठ गटात 15 वषीय मानस धामणे याने ऑस्ट्रेलियाच्या जेरेमी झांगचा 6-3, 6-3 असा पराभव केला.