वृत्तसंस्था /नवी दिल्ली
दिल्लीचे माजी मंत्री आणि आम आदमी पक्षाचे नेते सत्येंदर जैन यांना सर्वोच्च न्यायालयाने प्रकृती अस्वास्थ्याच्या कारणास्तव अंतरिम जामीन संमत केला आहे. शुक्रवारी न्यायालयाने हा निर्णय घोषित केला. 22 मे पासून त्यांची प्रकृती बिघडलेली आहे, असे न्यायालयात त्यांच्या वतीने स्पष्ट करण्यात आले. काही दिवसांपूर्वी जैन तिहार कारागृहाच्या बाथरुममध्ये पाय घसरल्याने पडले होते. त्यामुळे त्यांची प्रकृती बिघडली. ते त्याच्या आधीही आजारी होते, असा दावा त्यांच्या कुटुंबियांच्या वतीने करण्यात आला. पडल्यामुळे त्यांना ऑक्सिजनवर ठेवण्यात आले आहे. आता त्यांच्यावर सफदरजंग रुग्णालयात उपचार होत आहेत.
खासगी रुग्णालयाची अनुमती
सर्वोच्च न्यायालयाच्या सुटीतील पीठाने जैन यांना त्यांच्या पसंतीच्या खासगी रुग्णालयाचा सल्ला घेण्याची अनुमती दिली. जैन यांना स्नायूंची झीज होण्याचा विकार असून त्यांचे वजन 35 किलोंनी कमी झाले आहे. त्यांना आयसीयुत दाखल करण्यात आले असून त्यांची प्रकृती चिंताजनक आहे, असा दावा त्यांचे वकील अभिषेक मनु सिंघवी यांनी केला. तथापि, अतिरिक्त सॉलिसिटर जनरल एस. व्ही. राजू यांनी जामीन अर्जाला विरोध केला. कारागृहात उपास केल्याने जैन यांचे वजन कमी झाल्याचे प्रतिपादन त्यांनी केले. तथापि, न्यायालयाने त्यांचा जामीन अर्ज संमत केला. जैन यांना सहा आठवड्यांसाठी हा जामीन मिळाला आहे. जामिनाच्या काळात त्यांना कोणत्याही मुद्द्यावर पत्रकारांशी किंवा मिडियाशी बोलण्याची, तसेच मुलाखतींसाठी बंदी घालण्यात आल्याचेही न्यायालयाने स्पष्ट केले.