इम्फाळमध्ये 22 पासून होणार तिरंगी फुटबॉल स्पर्धा
वृत्तसंस्था/ कोलकाता
भारतीय फुटबॉल संघाचे प्रमुख प्रशिक्षक इगोर स्टिमॅक यांनी 23 सदस्यीय हंगामी संघाची शिबिरासाठी निवड केली आहे. बुधवारपासून हे शिबिर सुरू झाले असून सुनील छेत्री व मनवीर सिंग त्यात प्रमुख आघाडीचे खेळाडू आहेत.
या संघाचे कोलकात्यात पाच दिवसांचे शिबिर झाल्यानंतर ते इम्फाळला रवाना होतील. तेथे हा संघ तिरंगी आंतरराष्ट्रीय फुटबॉल स्पर्धेत भाग घेईल. खुमान लाम्पाक स्टेडियमवर 22 ते 28 मार्च या कालावधीत ही स्पर्धा होणार आहे. म्यानमार व किर्गीज प्रजासत्ताक हे या स्पर्धेतील अन्य दोन संघ आहेत. ही स्पर्धा जिंकण्यासाठी भारतीय संघ सर्वतोपरी प्रयत्न करणार असल्याचे प्रशिक्षक स्टिमॅक यांनी सांगितले.
निवडण्यात आलेल्या 23 पैकी 14 खेळाडू बुधवारी शिबिरात दाखल झाले. अन्य 9 खेळाडू 19 मार्च रोजी शिबिरात दाखल होतील. बेंगळूर एफसी व एटीके मोहन बागान संघातील हे 9 खेळाडू आहेत. आयएसएलची अंतिम लढत झाल्यानंतर दुसऱयाच दिवशी ते शिबिरासाठी दाखल होतील. याशिवाय 11 खेळाडूंची राखीव यादीही स्टिमॅक यांनी जाहीर केली असून गरज लागली तरच त्यांना शिबिरासाठी बोलावले जाणार आहे. आयएसएल अंतिम लढत झाल्यानंतर अंतिम संघाची घोषणा केली जाणार आहे.
तात्पुरते निवडण्यात आलेले 23 खेळाडू ः गोलरक्षक-गुरप्रीत सिंग संधू, फुरबा, लचेन्पा टेम्पा, अमरिंदर सिंग. बचावफळी-संदेश झिंगन, रोशन सिंग, अन्वर अली, आकाश मिश्रा, चिंगलेनसाना कोन्शाम, राहुल भेके, मेहताब सिंग, ग्लान मार्टिन्स. मध्यफळी-सुरेश वांगजम, रोहित कुमार, अनिरुद्ध थापा, ब्रँडन फर्नांडेस, यासिर मोहम्मद, रित्विक दास, जीक्सन सिंग, लालियानझुआला छांगटे, बिपिन सिंग. आघाडी फळी-मनवीर सिंग, सुनील छेत्री, शिवशक्ती नारायणन.
राखीव खेळाडू ः विशाल कैथ, प्रभसुखन सिंग, सुभाषिश बोस, प्रीतम कोटल, आशिष राय, नरेंदर गेहलोत, लिस्टन कुलासो, निखिल पुजारी, सहल अब्दुल समद, नाओरेम महेश सिंग, इशान पंडिता.