प्रतिनिधी /बेळगाव
बेळगाव व कोल्हापूर भागातील लहान खेडय़ांतील तरुण मुलींनी विमान वाहतूक उद्योगात यशस्वी झेप घेतली आहे. येथील ऍप्टेक एव्हिएशन अकॅडमीच्या विद्यार्थिनी असलेल्या बेळगाव येथील उर्दू माध्यमाची विद्यार्थिनी नफिया शिवापूर, सांगली जिह्यातील शिफा मुल्ला, सातारा जिह्यातील अंजली धाणे आणि बैलहोंगल येथील लक्ष्मी ओंकार यांची वेगवेगळय़ा विमान कंपन्यांच्या ऑनबोर्ड सेवेसाठी निवड करण्यात आली आहे.
विस्तारा एअरलाईन्समध्ये नफियाची एअरहोस्टेस म्हणून निवड झाली आहे, तर अंजली धाणे, लक्ष्मी ओंकार आणि शिफा मुल्ला या तीन मुलींची एअर इंडियाच्या ऑनबोर्ड केटरिंग सेवांसाठी निवड झाली आहे. कणगला गावातील सानिका मोरे आणि दांडेली गावातील मिताली गावकर या दोन मुलींची बेंगळूर विमानतळावरील विश्रामगृह सेवांसाठी निवड करण्यात आली आहे.
ऍप्टेक एव्हिएशन अकॅडमी आयोजित कार्यक्रमात ऍप्टेकचे रिजनल प्लेसमेंट हेड अखिल कृष्णन म्हणाले की, शहरी आणि इंग्रजी माध्यमातील मुलींपेक्षा जास्त तरुणी जिद्द व त्यांच्या प्रामाणिक मेहनतीमुळे विमान वाहतूक आणि हॉस्पिटॅलिटी उद्योगात यश मिळवत आहेत. सत्काराला उत्तर देताना पालक आणि विद्यार्थ्यांनी अŸप्टेक अकादमीचे संचालक विनोद बामणे आणि टीमचे मोलाचे मार्गदर्शन व कुशल प्रशिक्षणाबद्दल कृतज्ञता व्यक्त केली. श्री सरस्वती इन्फोटेकच्या ज्योती बामणे, प्रख्यात एव्हिएशन टेनर कोमल जानी, शाखा व्यवस्थापक प्रकाश पाटील यावेळी उपस्थित होते.