सीमाभागातून कौतुक : सच्च्या शिवप्रेमीला सदस्यपद दिल्याने आनंदोत्सव : गड-किल्ल्यांच्या संवर्धनाचे कार्य मोलाचे
वार्ताहर /कडोली
इतिहासातील सुवर्ण पाने उलगडण्यासाठी महाराष्ट्र सरकारने आता पाऊल उचलले आहे. त्यामुळे इतिहास व त्यातील साक्षीदार म्हणून असणाऱ्या गडकोटांच्या संवर्धनासाठी मोठे प्रयत्न सुरू केले आहेत. गडकोट संवर्धनासाठी दुर्ग प्राधिकरणाची स्थापना केली आहे. संवर्धनासाठी मोठा निधीही मंजूर केला आहे. या समितीमध्ये मूळचे कडोली व सध्या पुणे येथे स्थायिक असलेल्या पंडित अतिवाडकर यांचीही निवड केली. त्याबद्दल सीमाभागातून त्यांचे अभिनंदन करण्यात येत आहे.
महाराष्ट्र म्हटले की छत्रपती शिवाजी महाराज यांचे अनेक किल्ले डोळ्यांसमोर येतात. संपूर्ण इतिहासच या किल्ल्यांच्या माध्यमातून जगासमोर मांडला जातो. मात्र, गेल्या काही वर्षांमध्ये या किल्ल्यांची तसेच कडकोटांची पडझड झाली आहे. त्याकडे महाराष्ट्र सरकारचे दुर्लक्ष झाले होते. त्यामुळे शिवप्रेमी व छत्रपती शिवरायांचा आदर्श डोळ्dयांसमोर ठेवून या किल्ल्यांच्या संवर्धनाचे काम करत आहेत. कडोली येथील सुपुत्र पंडित अतिवाडकर यांनी गेल्या 15 वर्षांपासून या कामासाठी स्वत:ला वाहून घेतले आहे. कोणतीही अपेक्षा वा प्रसिद्धीच्या मागे न लागता त्यांनी जे कार्य केले त्याची दखल महाराष्ट्राने घेतली आहे.
शिवकालीन गड-किल्ले संवर्धनासाठी यापूर्वीही अतिवाडकर यांनी प्रयत्न केले आहेत. भारतीय इतिहास संशोधक पुणेतर्फे त्यांची निवड झाली आहे. 2008 पासून त्यांनी श्री शिवदुर्ग संवर्धन पुणेतर्फे रोहिरा गड, तिकोना गड, राजगड, पेडगाव/ धर्मवीरगड, किल्ले तुंग (कठीण गड), किल्ले अंतुर, माहूर गड येथे स्थानिक शिवभक्तांना एकत्र घेऊन गडसंवर्धनासाठी प्रयत्न केले आहेत.
गड संवर्धन समिती स्थापन
तत्कालीन मा. मंत्री, सांस्कृतिक कार्य यांच्या अध्यक्षतेखालील क्र. 1 च्या शासन निर्णयान्वये गड संवर्धन समिती स्थापन केली आहे. या समितीवरील अशासकीय सदस्यांच्या नियुक्तीसाठी प्रयत्न सुरू होते. पंडित यांचे यापूर्वीचे काम व त्यांची तळमळ पाहून त्यांना पुणे विभाग समितीमध्ये सदस्य म्हणून त्यांची नियुक्ती केली.
अतिवाडकर यांचे प्राथमिक, माध्यमिक शिक्षण कडोलीत झाले. त्यानंतर डिप्लोमा इन मेकॅनिकल इंजिनिअरिंगचे शिक्षण पूर्ण केले. व्यवसायासाठी पुणे येथे गेले आणि तेथे त्यांनी व्यवसाय सांभाळत शिवाजी महाराजांबद्दल असलेला आदर व गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचा निश्चय करून गड संवर्धन कामात वेळ देऊ लागले.
महाराष्ट्रातील शिवप्रेमींना घेऊन पंडित यांनी अनेक गडकोटांची साफसफाई, दुरुस्ती केली. केवळ पैशाच्या मागे न लागता आपण काही तरी समाजासमोर वेगळा आदर्श निर्माण करणे गरजेचे आहे, अशा भावनेतून त्यांनी गड-किल्ल्यांचे संवर्धन करण्याचे काम केले आहे. निवडीबद्दल त्यांचे कौतुक होत आहे.
पंडित यांचा आज सत्कार

निवडीबद्दल सोमवार दि. 5 रोजी सकाळी 11 वाजता येथील छ. शिवाजी महाराज पुतळा प्रतिष्ठापना कमिटी, गावातील विविध संस्था व ग्रामस्थांतर्फे पंडित अतिवाडकर यांचा सत्कार आयोजिला आहे. तरी सर्वांनी उपस्थित रहावे, असे आवाहन आयोजकांनी केले आहे.