मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे : मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व शिवाजी विद्यापीठातर्फे आयोजन
प्रतिनिधी/कोल्हापूर
मतदार जनजागृतीसाठी मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालय व शिवाजी विद्यापीठ यांच्या संयुक्त विद्यमाने आज, शनिवारी सकाळी 11 वाजता शिवाजी विद्यापीठाच्या राजर्षी शाहू सभागृहात ‘जगण्यातलं संविधान’ या विषयावर परिसंवादाचे आयोजन करण्यात आले आहे, अशी माहिती मुख्य निवडणूक अधिकारी श्रीकांत देशपांडे व शिवाजी विद्यापीठाचे प्र-कुलगुरु डॉ. पी. एस. पाटील यांनी शुक्रवारी पत्रकार परिषदेत दिली. मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून काम सुरु आहे, असेही देशपांडे यांनी सांगितले.
जिल्हाधिकारी कार्यालयात आयोजित पत्रकार परिषदेत ते बोलत होते.
श्रीकांत देशपांडे म्हणाले, परिसंवादामध्ये अंधश्रध्दा निर्मूलन समितीच्या मुक्ता दाभोलकर, स्तंभलेखक सॅबी परेरा, किर्तनकार सचिन पवार, प्रा. राहुल सरवटे, प्रा. गायत्री लेले, श्रीकांत देशपांडे आदी सहभागी होणार आहेत. मुख्य निवडणूक अधिकारी कार्यालयाचे डॉ. दीपक पवार हे संवादक आहेत. यावेळी डॉ. दीपक पवार संपादित ‘कशासाठी लिंगभाव समतेसाठी’ या पुस्तकाचे प्रकाशन लोकसाहित्य अभ्यासक तारा भवाळकर यांच्या हस्ते होणार आहे. हे पुस्तक म्हणजे जागतिक महिला दिनानिमित्त लिंगभाव समतेवर आयोजित केलेल्या अनुभव लेखनाचे संकलन आहे. या पुस्तकात विविध वयोगटातील स्त्री-पुरुषांना लिंगभाव समता आपल्या जगण्यात आणताता केलेला् संघर्षाचे अनुभव कथन करण्यात आले आहे.
ते पुढे म्हणाले, मतदार नोंदणीसाठी महाविद्यालयीन विद्यार्थी हाच केंद्रबिंदू मानून काम सुरु आहे. त्यासाठी महाविद्यालय व विद्यापीठस्तरावर विविध उपक्रम घेतले जात आहेत.
प्र-कुलगुरु पाटील म्हणाले, शिवाजी विद्यापीठाच्या माध्यमातून मतदार जनजागृतीसाठी अनेक उपक्रम राबविले जात आहेत. इतर विविध विषयांप्रमाणेच निवडणूक या विषयावरही विद्यार्थी अभ्यास करत आहेत. दरवर्षी 25 जानेवारी ते 10 फेब्रुवारी या काळात शिवाजी विद्यापीठात ‘लोकशाही पंधरवडा’ साजरा केला जातो. डेमॉक्रसी व गुड गव्हर्नन्स हा चांगला उपक्रम विद्यापीठात राबविला जात आहे.
यावेळी जिल्हाधिकारी राहुल रेखावार, उपजिल्हा निवडणूक अधिकारी भगवान कांबळे, डॉ. प्रल्हाद माने आदी उपस्थित होते.
शिवाजी विद्यापीठात मतदार नोंदणी दालन
संविधान दिनानिमित्त शिवाजी विद्यापीठात विद्यार्थ्यांसाठी मतदार नोंदणी दालन उभारण्यात येणार आहे. त्याचबरोबर निवडणूक व लोकशाही साक्षरतेसाठी ल्युडो, सापशिडी या खेळांचे आयोजन करण्यात येणार आहे. विद्यार्थ्यांना संविधानाची मुलभूत माहिती होण्यासाठी ‘संविधानाची भिंत’ उभारण्यात येणार आहे. तसेच पथनाटय़ाचेही सादरीकरण होणार आहे.
निवडणूक साक्षरता मंडळ 70 कॉलेजमध्ये स्थापन
शिवाजी विद्यापीठ कार्यक्षेत्रातील 277 महाविद्यालयांना ‘निवडणूक साक्षरता मंडळ’ स्थापन करण्याबाबत परिपत्रकाद्वारे कळविण्यात आले आहे. यातील 70 कॉलेजमध्ये हे मंडळ सुरु करण्यात आले आहे. उर्वरीत कॉलेजमध्ये येत्या वर्षभरात हे मंडळ स्थापन होईल, असा विश्वास आहे, असे प्र-कुलगुरु पाटील यांनी सांगितले.