सलग तिसऱया घसरणीची नोंद ः जागतिक पातळीवरील प्रभाव
वृत्तसंस्था/ मुंबई
भारतीय भांडवली बाजारात चालू आठवडय़ातील दुसऱया सत्रात मंगळवारी बीएसई सेन्सेक्स व निफ्टी यांचे निर्देशांक घसरणीसोबत बंद झाले आहेत. यामध्ये प्रामुख्याने जागतिक पातळीवर नकारात्मक स्थिती व कच्च्या तेलाच्या किमतीमधील तेजी या कारणास्तव देशातील बाजार घसरणीसह बंद झाले आहेत.
दिग्गज कंपन्यांच्या मदतीने बीएसई सेन्सेक्स 208.24 अंकांनी प्रभावीत होत निर्देशांक 62,626.36 वर बंद झाला. याच्या विरुद्ध बाजूला राष्ट्रीय शेअर बाजाराचा निफ्टी हा 58.30 अंकांनी घसरुन तो 18,642.75 वर बंद झाला आहे.
प्रमुख कंपन्यांमध्ये सेन्सेक्समधील टाटा स्टील, डॉ.रेड्डीज लॅब, इन्फोसिस, भारतीय स्टेट बँक, भारती एअरटेल, आयसीआयसीआय बँक, इंडसइंड बँक, टाटा कन्सल्टन्सी सर्व्हिसेस, टेक महिंद्रा, एचसीएल टेक आणि मारुती यांचे समभाग नुकसानीसह बंद झाले आहेत. अन्य कंपन्यांमध्ये हिंदुस्थान युनिलिव्हर, अल्ट्राटेक सिमेंट, पॉवरग्रिड कॉर्प आणि नेस्ले इंडिया यांचे समभाग तेजीसह बंद झाले आहेत.
आशियातील अन्य बाजारांमध्ये दक्षिण कोरियाचा कॉस्पी आणि हाँगकाँगचा हँगसेंग हे नुकसानीत तर जपानचा निक्की व चीनचा शांघाय कम्पोझिट हा लाभासह बंद झाला. युरोपमधील मुख्य बाजार सुरुवातीला घसरणीचा कल घेऊन कार्यरत राहिले होते. याच दरम्यान आंतरराष्ट्रीय बाजारात कच्चे तेल 0.68 टक्क्यांनी वधारुन 83.24 डॉलर प्रति बॅरेलवर पोहोचले
आहे.
चालू आठवडय़ात सुरु असलेल्या घसरणीचे संकेत हे मागील आठवडय़ाच्या अंतिम दिवशी शेअर बाजारातील अभ्यासकांनी दिले होते. कारण मागील आठवडय़ातील व त्या अगोदरही असे मिळून जवळपास आठ सत्राच्या दरम्यान बाजाराने मोठय़ा तेजीची कामगिरी केली होती. परंतु तेजीनंतर बाजारात पुन्हा घसरणीचे सत्र राहणार असल्याचे भाकीत केले होते. आता ते खरे होत असल्याचे दिसून येत आहे.