पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांची ग्वाही
पणजी : शॅकमालकांनी उपस्थित केलेल्या प्रश्नांवरूनच ‘शॅक मॉडेल’ धोरण तयार करण्यात आले आहे. त्यामुळे शॅक व्यवसाय परप्रांतीयांकडे जाण्याचा प्रश्नच येत नाही. हे धोरण अद्याप राबविले नसून त्यासाठी किनारपट्टीच्या भागातील आमदार तसेच शॅकमालक यांना विश्वासात घेण्यात येणार आहे. त्यांच्या सोयीनुसार धोरण तयार केले जाईल, अशी माहिती पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी विधानसभेत दिली. मंत्री खंवटे पुढे म्हणाले की, आपण किनारी भागात फिरून पाहिले असता एकाही शॅकवर गोमंतकीय कामगार दिसला नाही. तसेच अनेक ठिकाणी बेकायदेशीर प्रकार होतात. हे सगळे प्रकार बंद करून शॅक व्यवस्य उच्च स्तरावर पोहचविण्याचा आपला प्रयत्न आहे. राज्यातील ‘शॅक मॉडेल’चा विषय काल सोमवारी विधानसभेत बराच गाजला. आमदार मायकल लोबो यांनी काळे कोट घालून गोव्यात येणारे पैसेवाले सत्ताधाऱ्यांना भेटतात आणि शॅक मिळवतात, असे सहजपणे म्हणताच पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी त्यांना प्रतिप्रश्न केला. काळे कोट घालून येणारे कोण, आणि ते कुणाला भेटतात, त्यांची नावे सांगा अशी मागणी खंवटे यांनी केली. यावेळी विधानसभेत प्रचंड गदारोळ झाला. नंतर मायकल लोबो यांनी सारवासारव करण्याचा प्रयत्न केला. लक्षवेधी सूचनेवेळी आरजीचे आमदार विरेश बोरकर यांनी शॅकच्या मॉडेलसंदर्भात प्रश्न उपस्थित केला होता. शॅक मॉडेल धोरण राबविल्यानंतर हे सर्व शॅक परप्रांतीयांच्या हातात जाणार आहेत. कोट्यावधी ऊपयांचे मॉडेल तयार करण्यात आले असून गोमंतकीयांना ते मॉडेल परवडणारे नाही आणि परिणामी ते परप्रांतीयांच्या हातात जाईल. त्यामुळे शॅक मॉडेल धोरण रद्द करावे. 1970 सालापासून गोमंतकीय शॅक व्यवसाय करीत असून ती गोव्याची ओळख आहे, असेही बोरकर म्हणाले.
शॅक व्यवसाय हिसकावून घेणार काय?
गोवा फॉरर्वडचे आमदार विजय देसाई म्हणाले की मुळात शॅक व्यवसाय व्यवस्थित चालत नाही म्हणून शॅकमालक सरकारकडे सहकार्य करण्याची याचना करतात. त्यांना सहकार्य करण्याचे सोडून सरकार त्यांच्याकडून हा व्यवसाय हिसकावून घेण्याचा प्रयत्न करीत आहे की काय? असा प्रश्नही त्यांनी उपस्थित केला.
सरकारकडून जनतेच्या पैशांची उधळपट्टी
सरकार जनतेच्या पैशांची उधळपट्टी करीत आहे. कोल्हापूर ते गोव्यात यायला विमानांचा वापर केला जातो. जनतेच्या पैशांतून मुख्यमंत्री पक्षाच्या प्रचारासाठी इतर राज्यात फिरतात. महागड्या गाड्या खरेदी केल्या जातात, मात्र सरकारी योजना राबविण्यासाठी तिजोरीत खडखडाट आहे, अशीही टीकाही सरदेसाई यांनी केली. काळ्या कोटवाले ते कोण, कोणाला भेटतात? पर्यटनमंत्री रोहन खंवटे यांनी काळे कोट घालून गोव्यात येणारे कोण आणि कुणाला भेटतात त्यांची नावे उघड करावी, असे खुले आव्हान मायकल लोबो यांना नाव न घेता दिले. दुखणे एकीकडे आणि औषध दुसरीकडे असा प्रकार कुणी करू नये. सत्ताधारी पक्षातील आमदारांनी जबाबदारीने वक्तव्य करावे, आपण काय बोलतो याचा विचार करावा, असा सल्लाही मंत्री रोहन खवटे यांनी दिला आहे.