वृत्तसंस्था/ मुंबई
अखिल भारतीय महिला निवड समितीने दक्षिण आफ्रिकेविरुद्ध होणाऱया यू-19 टी-20 मालिकेसाठी तसेच त्यानंतर होणाऱया आयसीसी यू-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धेसाठी भारतीय महिला संघाची घोषणा केली असून या संघांचे नेतृत्व शफाली वर्माकडे देण्यात आले आहे.
यू-19 महिला टी-20 विश्वचषक स्पर्धा पहिल्यांदाच होत असून त्यात 16 संघांचा सहभाग असणार आहे. 14 ते 29 जानेवारी 2023 या कालावधीत ही स्पर्धा दक्षिण आफ्रिकेत खेळविली जाणार आहे. त्याआधी भारताचा यू-19 महिला संघ 27 डिसेंबर ते 4 जानेवारी या कालावधीत दक्षिण आफ्रिकेविरुद्ध प्रिटोरिया येथे पाच टी-20 सामने खेळणार आहे. 18 वर्षीय भारतीय सलामीवीर शफाली वर्माकडे यू-19 विश्वचषक स्पर्धेत नेतृत्व तर श्वेता सेहरावत हिच्याकडे उपकर्णधारपदाची जबाबदारी सोपविण्यात आली आहे. वरिष्ठ संघातून खेळलेल्या 19 वर्षीय यष्टिरक्षक रिचा घोषचीही 15 सदस्यीय संघात निवड करण्यात आली असून तिने 25 टी-20 व 17 वनडे सामने खेळले आहेत.

या स्पर्धेत भारताचा ड गटात समावेश असून याच गटात यजमान दक्षिण आफ्रिका, यूएई, स्कॉटलंड यांचाही समावेश आहे. प्रत्येक गटातील टॉप तीन संघ सुपरसिक्स फेरीत खेळतील. सुपरसिक्स फेरीत सहा संघांचे दोन गट करण्यात आले आहेत. या फेरीतील प्रत्येक गटातील अव्वल दोन संघ उपांत्य फेरीत खेळतील. उपांत्य लढती 27 जानेवारी रोजी होतील तर पोश्चेफस्ट्रूम येथेच जेतेपदाची लढत 29 जानेवारीस होईल. 14 जानेवारीस भारताची सलामीची लढत यजमान द.आफ्रिकेविरुद्ध, त्यानंतर 16 जानेवारीस यूएईविरुद्ध व 18 जानेवारीस स्कॉटलंडविरुद्ध पुढील सामने होतील. या स्पर्धेतून भविष्यातील महिला स्टार क्रिकेटपटूंचा खेळ पहावयास मिळण्याची अपेक्षा आहे. 14 ते 29 जानेवारी या कालावधीत एकूण 41 सामने होणार आहेत.
यू-19 महिला वर्ल्ड कप संघ ः शफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), रिचा घोष, जी. तृषा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ली गाला, हृषिता बसू, सोनम यादव, फलक नाझ, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा, टिटस साधू, शबनम एमडी.
यू-19 महिला संघ द.आफ्रिका मालिकेसाठाr ः शफाली वर्मा (कर्णधार), श्वेता सेहरावत (उपकर्णधार), रिचा घोष, जी. तृषा, सौम्या तिवारी, सोनिया मेहदिया, हर्ली गाला, हृषिता बसू, सोनम यादव, फलक नाझ, मन्नत कश्यप, अर्चना देवी, पार्श्वी चोप्रा, टिटस साधू, शबनम एमडी., शिखा, नजला सीएमसी, यशश्री.