संकेत रेवणकर मालिकावीर, किशन कुडतूडकर सामनावीर

क्रीडा प्रतिनिधी /बेळगाव
भेदक गोलंदाजी व आक्रमक फलंदाजीच्या जोरावर शांतादुर्गा ज्वेलर्स इलेव्हन संघाने एकता सोलापूर संघाचा 5 गड्यांनी पराभव करुन 24 वा दैवेज्ञ चषक पटकाविला. संकेत रेवणकर (एसईजे) मालिकावीर तर किशन कुडतूडकर यांना सामनावीर पुरस्काराने गौरविण्यात आले.
दैवज्ञ स्पोर्ट्स आयोजित दैवज्ञ बँक पुरस्कृत दैवज्ञ समाज मर्यादित 24 व्या दैवज्ञ चषक टेनिस बॉल स्पर्धेच्या अंतिम सामन्यात पहिल्या डावात प्रथम फलंदाजी करताना एकता सोलापूर संघाने 9 षटकात सर्व गडी बाद 43 धावा केल्या. त्यात संकेत अन्वेकरने 15 धावा केल्या. शांतादुर्गातर्फे संकेत रेवणकरने 11 धावात 4, निखिल पावसकर व आशिष मालवणकर यांनी प्रत्येकी 2 तर विजय वेर्णेकरने 1 गडी बाद केला. प्रत्युत्तरादाखल खेळताना शांतादुर्गा संघाने 10 षटकात 8 गडी बाद 89 धावा करुन पहिल्या डावात 46 धावांची आघाडी मिळविली. त्यात किशनने 2 षटकार 4 चौकारांसह 34, विजयने 2 षटकारांसह 17, संकेतने 14 तर प्रसादने 13 धावा केल्या. सोलापूरतर्फे निरजने 7 धावात 4, प्रसादने 2 तर प्रकारश कुरडेकर व रोषण रेवणकर यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
दुसऱ्या डावात प्रथम फलंदाजी करताना एकता सोलापूरने 10 षटकात 9 गडी बाद 73 धावा केल्या. त्यात निरजने 15, प्रसाद व विजू यांनी प्रत्येकी 14 धावा केल्या. शांतादुर्गातर्फे संकेत रेवणकरने 13 धावात 4 तर आशिष मालवणकर व विजय वेर्णेकर यांनी प्रत्येकी 2 गडी बाद केले. 46 धावांची आघाडी मिळविल्याने शांतादुर्गा संघाला विजयासाठी केवळ 28 धावांची गरज होती. दुसऱ्या डावात शांतादुर्गाने 5.1 षटकात 5 गडी बाद 28 धावा करुन सामना 5 गड्यांनी जिंकला. त्यात संकेत रेवणकरने 13 धावा केल्या. सोलापूरतर्फे प्रसादने 18 धावात 3, प्रकाश व नागराज यांनी प्रत्येकी 1 गडी बाद केला.
सामन्यानंतर प्रमुख पाहुणे दैवज्ञ बँकेचे चेअरमन जयकुमार नागेश भट, दैवज्ञ सेवा संघाचे अध्यक्ष दयानंद नेतलकर, दीपक कालवेकर, तेजस्वीनी अन्वेकर, रघुनाथ सेजलकर, दिनानाथ रेवणकर, महाबळेश्वर शेजेखान, विनिता शेठ, शांताराम वेर्णेकर, स्पोर्ट्स क्लबचे अध्यक्ष जीवन वेर्णेकर व संतोष वेर्णेकर आदी मान्यवर उपस्थित होते. पाहुण्यांच्या हस्ते विजेत्या शांतादुर्गा संघाला रोख 51 हजार रु. व दोन किलोचा चांदीचा चषक व उपविजेत्या सोलापूर संघाला 25 हजार रु. रोख व चषक देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यातील सामनावीर किसन कुडतूडकर, उत्कृष्ट फलंदाज गुरुप्रसाद पोतदार, उत्कृष्ट गोलंदाज विजय वेर्णेकर, उत्कृष्ट झेल अश्विन पावसकर, उत्कृष्ट यष्टीरक्षक विजय, उत्कृष्ट क्षेत्ररक्षक ओम वेर्णेकर, अष्टपैलू क्रिकेटपटू प्रसाद, स्पर्धेत छाप टाकणारा क्रिकेटपटू प्रसाद तलवेकर व मालिकावीर संकेत रेवणकर यांना चषक व रोख रक्कम देऊन गौरविण्यात आले. अंतिम सामन्यासाठी पंच म्हणून प्रमोद पवार व उमेश मजुकर यांनी काम पाहिले. तर स्कोरर म्हणून रोषण यांनी काम पाहिले.