ऑनलाईन टीम/तरुण भारत
राष्ट्रवादीचे एक पत्र सध्या सोशल मीडियावर व्हायरल होतंय. त्यात कार्यकारिणी बरखास्त करण्यात आल्याचे स्पष्ट होतं आहे. विविध निवडणुकीच्या तोंडावर जुन्या पदाधिकाऱ्यांना बदलून नव्या नियुक्त्या केल्या जाण्याची शक्यता राजकीय वर्तुळात वर्तवण्यात येत आहे. राष्ट्रवादी काँग्रेसचे अध्यक्ष शरद पवार (Sharad Pawar) यांनी यांच्या संमतीने राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाचे राष्ट्रीय स्तरावरील सर्व विभाग तसंच सेल बरखास्त करण्यात आले आहेत. असे ट्विट राष्ट्रवादीचे खासदार प्रफुल्ल पटेल (Praful Patel) यांनी केले आहे.

शरद पवार यांनी राष्ट्रवादी महिला काँग्रेस, राष्ट्रवादी युवक काँग्रेस आणि राष्ट्रवादी विद्यार्थी काँग्रेस वगळता राष्ट्रवादीचे सर्व राष्ट्रीय स्तरावरील विभाग आणि कक्ष तातडीने बरखास्त केले आहेत अशी माहिती प्रफुल्ल पटेल दिली आहे. सोशल मीडियावर पटेल यांची सही असलेल्या पत्रात पक्षाचे सर्व विभाग आणि सेल बरखास्त करण्यात आल्याचा निर्णय घेतल्याचं सांगण्यात आलायं. हा निर्णय राष्ट्रीय पातळीवर असल्याचं स्पष्ट केलंय. तसेच त्याचा महाराष्ट्र किंवा इतर कुठल्याही राज्यातील पक्ष संघटनेशी संबंध नसल्याचंही पटेल यांनी स्पष्ट केलं आहे.