ऑनलाईन टीम / तरुण भारत :
राज्यपाल भगतसिंह कोश्यारी यांच्यासह भाजपच्या अन्य नेत्यांनी महापुरुषांविरोधात केलेल्या अवमानकारक वक्तव्याच्या निषेधार्थ आज ‘मविआ’ने मुंबईत महामोर्चाची हाक दिली आहे. या मोर्चात सहभागी होण्यासाठी मविआचे दिग्गज नेते मोर्चास्थळी उपस्थित आहेत. दरम्यान, साडेबारा वाजता महाविकास आघाडीची सभा पार पडणार आहे. या सभेला राष्ट्रवादीचे अध्यक्ष शरद पवार संबोधित करणार असल्याची माहिती आहे.
शरद पवार तब्बेतीच्या कारणामुळे महामोर्चाला उपस्थित राहणार नसल्याचे सांगण्यात येत होते. मात्र, आता शरद पवार साडेबारा वाजता सभास्थळी उपस्थित राहणार असून, ते सभेला संबोधित करणार असल्याचे सांगण्यात येते. भाजप नेत्यांकडून मविआच्या महापुरूषांचा अवमान सुरू आहे. मात्र, राज्य व केंद्र सरकारने त्यांच्याविरोधात कोणतीही दखल न घेतल्याने पवारांनी काल खंत व्यक्त केली होती. त्यामुळे पवार आज सभेला काय संबोधित करणार याकडे सर्वांचं लक्ष लागले आहे.
अधिक वाचा : शिंदे गटाचे 3 आमदार राष्ट्रवादीच्या संपर्कात; अमोल मिटकरींचा गौप्यस्फोट
भायखळय़ातील रिचर्डसन्स अँड क्रूडास कंपनी ते टाइम्स ऑफ इंडियाच्या इमारतीपर्यंत मविआचा महामोर्चा असेल. या मोर्चाआधी मुंबई सेंट्रलमधील हॉटेलमध्ये मविआ नेत्यांची बैठक होणार आहे. त्यानंतर मोर्चाला सुरूवात होणार आहे. मोर्चासाठी मुंबईत मविआचे हजारो कार्यकर्ते दाखल झाले आहेत.