सत्तेचा महिमा अगाध असतो. सत्तेची शक्तीही विराट असते. सत्तेपुढे शहाणपण चालत नाही असे म्हटले जाते. तरीही सत्ता जे शहाणपण शिकवते त्यातून भलेभले रसायन विरळ होत जाते. शिवसेनेच्या वाघांना सत्तेची चव आवडली आणि ते त्यात गुरफटले! स्वपक्षाच्या प्रमुखाची सत्ता घालवून पक्ष बळकट करण्यासाठीही सिध्द झाले. दुसरीकडे आदेश देणाऱयांना मनधरणी करायची वेळ आली आहे. महाराष्ट्रात शिवसेना नावाच्या एका झंझावाती पक्षाची ही ससेहोलपट सुरू आहे. शिंदे यांनी जय महाराष्ट्र केलेलाच आहे आणि 41 आमदारांच्या गटांचा राज्यपालांना प्रस्ताव जाणार हे नक्की झाले आहे. त्याआधी समजुतीचा मार्ग काढायचे प्रयत्न सुरू झाले आहेत. त्याची उत्कंठा आहे. ते फसले तर घटनात्मक पेच निर्माण होतो का आणि तो राज्यपाल करणार की नरहरी झिरवळ हे पहावे लागणार आहे. बुधवारी मुख्यमंत्री उद्धव ठाकरे यांनी एकनाथ शिंदेंसह जनतेला फेसबुकद्वारे संदेश पोहोचवला. त्यावेळी त्यांनी समोर येऊन सांगावे, ‘पक्षाचाच मुख्यमंत्री होणार असेल तर’ राजीनामा देण्याची तयारी दर्शवली. वर्षा बंगला त्यागून मातोश्रीवर राहायलाही गेले. यावेळी वर्षानुवर्षे त्यांच्या मागेपुढे करणारे आमदार सोबत नव्हते तर रस्त्यावरचा कार्यकर्ता डोळय़ात अश्रु आणि हातात फुले घेऊन त्यांची हिंमत वाढवत होता. कार्पोरेट लागण झालेल्या सर्वच राजकीय पक्षांना जमिनीवर आणणारी ही घटना आहे. गमावण्यासारखे खूप आहे त्यांनी ठाकरेंची साथ सोडली पण पक्षावरचे संकट पाहून शिवसैनिक उसळून उठला. हितसंबंधांमुळे अडचणीत आलेल्यांनी मात्र ठाकरे यांना दोषी ठरवले. गळती थांबलेली नाही. नव्याने काही आमदार सामील होतानाचा व्हिडिओ प्रसारित करतानाच उद्धव ठाकरे यांच्या नावाने आमदार संजय शिरसाट यांचे पत्रही एकनाथ शिंदे यांनी ट्विटरच्या माध्यमातून प्रसारित केले आहे. आपण हिंदुत्वासाठी शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे आणि आनंद दिघे यांच्या दाखवलेल्या मार्गावरून वाटचाल करीत आहोत. भाजपसोबत जाण्यातच हित आहे असा संदेश शिंदे यांनी दिला आहे. माध्यमानी विचारलेल्या प्रश्नांना उत्तरे देताना, तुम्ही आजही उद्धव ठाकरे यांना आपला नेता मानता का? या प्रश्नाच्या वेळी मात्र योगायोगाने त्यांचा फोन संपर्क तुटत होता! आपल्या सोबतच्या आमदारांचा गट हाच खरा पक्ष आहे असा शिंदे यांचा दावा आहे. माध्यमांमधील बातम्या नुसार शिंदे हे पक्षावर आणि पक्षाच्या चिन्हावरही दावा करणार आहेत. अशी चर्चा उठल्याशिवाय गोंधळ माजत नाही. तो माजल्याशिवय हेतू साध्य होत नाही हे माहिती असल्याने असे हातखंडे वापरले जातात. प्रत्यक्षात पक्ष आणि त्याच्या चिन्हाची लढाई ही खूप दूरची आहे. विधिमंडळ पक्ष आणि प्रत्यक्ष राजकीय पक्ष या दोन वेगवेगळय़ा गोष्टी आहेत. राजकीय पक्ष हा वृक्ष असेल तर विधिमंडळ पक्ष ही त्याची फांदी असते. प्रत्येक राजकीय पक्षाच्या जीवनात विधिमंडळ पक्षात फाटाफूट होतच असते. पण म्हणून संपूर्ण पक्षावर दावा सांगता येत नाही. पक्षाचे अध्यक्ष, सचिव आणि संपूर्ण रचना, घटना त्याची नोंदणी या बाबी वेगळय़ा आहेत आणि पक्षाकडून एबी फॉर्म घेऊन पक्षाच्या चिन्हावर निवडून आलेले आमदार विधिमंडळात स्थापन करत असलेला पक्ष किंवा गट ही एक वेगळी गोष्ट आहे. त्यामुळे विधिमंडळ गट फुटला म्हणजे संपूर्ण पक्ष एका ताब्यात जाईल असे होत नाही. विशेष करून शिवसेनेसारखा पक्ष, ज्याची संरचना एखाद्या संघटने सारखी आहे. तिथे शाखा पातळीवर काम करणाऱया शिवसैनिकाला महत्त्व आहे. त्याच्या जोरावरच आतापर्यंत अशा प्रकारच्या सर्व फुटीला शिवसेनाप्रमुख बाळासाहेब ठाकरे यांच्या काळात पक्षाने चोख प्रत्युत्तर दिले आहे. आता वेळ उद्धव ठाकरे यांची आहे. त्यादृष्टीने त्यांनी त्यांची पहिली खेळी खेळली आहे. हिंदुत्वासाठी आणि उद्धव ठाकरे यांनी वेळ न दिल्याने, काँग्रेस-राष्ट्रवादीच्या लोकांना वेळ आणि निधी दिल्याचे आरोप ठाकरे यांच्यावर केले आहेत. त्याचवेळी महाविकास आघाडीतून बाहेर पडू मात्र मुंबईत या असा निरोप ठाकरे यांनी पाठवला आहे. विधिमंडळ पक्ष वाचवण्याचे आटोकाट प्रयत्न सुरू आहेत. पण, केंद्रीय यंत्रणांची चौकशी ही ज्यांची डोकेदुखी आहे ते ठाकरे यांचे आवाहन स्वीकारणे मुश्कील आहे. त्यामुळे शिंदे यांचा जय महाराष्ट्र ठरलेला असून जर कोणी आमदार परत फिरले किंवा एखाद्या सुवर्ण मध्यावर ठाकरे-शिंदे यांचे जमले तर तो चमत्कारच ठरेल. पण अजून बरेच काही होणे बाकी आहे. यापुढच्या खेळीत भाजप उतरते का? त्यांच्या अटी काय? सगळय़ा इच्छुकांना मंत्रीपद मिळणार का? हे पाहावे लागणार आहे. विधानसभा उपाध्यक्ष नरहरी झिरवळ यांनी एकनाथ शिंदे यांच्याऐवजी गटनेते म्हणून ठाकरे यांनी नेमलेल्या चौधरी यांना मान्यता दिली आहे. त्यामुळे अजूनही राज्यपालांकडे शिंदे गटाचा मोर्चा वळू शकतो. त्यापूर्वी एकमत झाले नाही तर अविश्वास येतो की पाठींबा काढून घेतात आणि राज्यपाल किती दिवसात बहुमत सिध्द करायला सांगतात? दुसरे काही नाटय़ घडते का? हेही दिसेलच. पण सत्तेचा महिमा काय करतो हे यातून दिसले, अजून दिसणार आहे.
Previous Articleमिशेल-ब्लंडेलने न्यूझीलंडचा डाव सावरला
Next Article अमेरिकेत 5 मित्रांची अनोखी परंपरा
Related Posts
Add A Comment