दोन वर्षांनंतर मंडळांचा सक्रिय सहभाग : अनेक मंडळांकडून चित्ररथ देखाव्यांचे मनमोहक सादरीकरण : संपूर्ण शहर शिवमय

खानापूर : गेली दोन वर्षे शिवजयंती उत्सव साजरा करता आला नाही. यावर्षी शहरातील सर्वच शिवजयंती उत्सव मंडळांनी सक्रीय होऊन शिवजयंती उत्साहात साजरी केली. भव्य चित्ररथ देखावे साकारण्यात आले होते. मध्यवर्ती शिवजयंती उत्सव मंडळाने पालखीचे पूजन रात्री 8 वा. आमदार अंजली निंबाळकर यांच्या हस्ते करण्यात आले.
यावेळी चव्हाटा युवक मंडळाच्या चित्ररथाचे पूजन विठ्ठल हलगेकर, भाजप अध्यक्ष संजय कुबल, जिल्हा उपाध्यक्ष प्रमोद कोचेरी यांच्या हस्ते करण्यात आले. यावेळी चव्हाटा युवक मंडळचे अध्यक्ष राहुल सावंत, संतोष गावडे यासह कार्यकर्ते उपस्थित होते.
शिवा काशिद यांचा सजीव देखावा साकारण्यात आला होता. चव्हाटा युवक मंडळाने झांज पथकाची स्थापना केली आहे. यासाठी विठ्ठल हलगेकर यांनी आर्थिक सहकार्य केले. भगवा रक्षक संघटनेने देसाई गल्ली येथे शिवपूजन केले.
याप्रसंगी रवळनाथ युवक मंडळाने भव्य देखावा साकारला होता. यामध्ये जिजाबाईंचा लग्न सोहळा, शिवाजी महाराजांचा जन्मोत्सव, पुण्याच्या महालाची वास्तुशांती व गेंधळ असा सजीव देखावा साकारण्यात आला होता. महालक्ष्मी युवक मंडळाने संभाजी महाराजांचे बलिदान हा देखावा सादर केला होता. शहरातील चौकाचौकात या देखाव्यांचे आयोजन करण्यात येत होते.
देखावे पाहण्यासाठी महिला व पुरुषवर्ग तसेच शिवप्रेमी कार्यकर्ते मोठय़ा संख्येने पहाटेपर्यंत सहभागी झाले होता. यावेळी संपूर्ण शहर शिवमय झाले होते.