ऑनलाईन टीम / मुंबई :
युवासेना प्रमुख आणि राज्याचे पर्यावरण मंत्री आदित्य ठाकरे (Aditya Thackeray) यांच्या दौऱ्याआधी अयोध्येत शिवसेनेकडून पोस्टरबाजी करण्यात आली आहे. या पोस्टरबाजीतून शिवसेनेने मनसेला डिवचलं आहे. “असली आ रहा है, नकली से सावधान”, अशा शब्दात शिवसेनेने मनसे अध्यक्ष राज ठाकरेंना (Raj Thackeray) टोला लगावला आहे.
राज ठाकरे 5 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. तर आदित्य ठाकरे 10 जूनला अयोध्या दौऱ्यावर जाणार आहेत. त्यासाठी सेनेकडून तयारी सुरू आहे. त्यामुळे अयोध्या दौऱ्यावरून शिवसेनेत आरोप-प्रत्यारोप सुरू आहेत. शिवसेना-मनसे वाद आता अयोध्येतही पोहचला आहे. शिवसेनेने अयोध्येत पोस्टरबाजी करत राज ठाकरेंना डिवचलं आहे. “असली आ रहा है, नकली से सावधान”, असं लिहिलेली पोस्टर्स शिवसेनेकडून अयोध्येत ठिकठिकाणी लावण्यात आली आहेत. त्यावर उद्धव ठाकरे, आदित्य ठाकरे आणि बाळासाहेब ठाकरे यांचेही फोटो आहेत. आदित्य ठाकरेंच्या दौऱ्याच्या पार्श्वभूमीवर राज ठाकरेंना या पोस्टर्समधून टोला लगावला आहे.
दरम्यान, राज ठाकरे यांनी आपला आयोध्या दौरा जाहीर केल्यानंतर मनसेकडूनही अयोध्येत पोस्टर लावण्यात आले होते. ‘राज’ तिलक की करो तैयारी आ रहे है भगवा धारी, चलो अयोध्या…’ असं या पोस्टर्सवर लिहिण्यात आलं होतं.