महालक्ष्मी ग्रुपतर्फे सलग चार दिवस आयोजन : खानापूर तालुक्यातील जनतेला मोफत प्रवेश
प्रतिनिधी /खानापूर
महालक्ष्मी ग्रुपचे संस्थापक विठ्ठलराव हलगेकर यांच्या वाढदिवसानिमित्त महालक्ष्मी ग्रुपच्यावतीने खानापूर तालुक्यातील जनतेला शिवरायांच्या उत्तुंग कर्तृत्वाची अनुभूती घेता यावी, यासाठी शनिवार दि. 7 जानेवारीपासून सलग चार दिवस शांतीनिकेतन शाळेच्या मैदानावर शिवगर्जना या महानाट्याचे आयोजन करण्यात आले आहे. या महानाट्याच्या सादरीकरणासाठी भव्य असा शामियाना उभारण्यात आला आहे. सुमारे 15 हजार प्रेक्षक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे.
याबाबत माहिती देताना विठ्ठल हलगेकर म्हणाले, छत्रपती शिवाजी महाराजांचे कर्तृत्व आणि विचार सर्वकालिक आहेत. आजही समाजाला राष्ट्रनिष्ठेची शिकवण आणि चरित्र संवर्धनाचे संस्कार देण्याचे कार्य शिवचरित्राकडून होत आहे. शिवचरित्र घराघरात आणि मनामनात पोहोचणे आवश्यक असल्यानेच शिवाजी महाराजांवरील महानाट्याचे आयोजन केले असल्याचे सांगितले.
15 हजार प्रेक्षक बसण्याची आसन व्यवस्था
दि. 7 ते 10 जानेवारी या काळात दररोज सायंकाळी 6 ते रात्री 9 या वेळेत आशिया खंडातील सर्वात मोठे महानाट्या म्हणून लौकिक मिळविलेल्या शिवगर्जना महानाट्याचा रोमांच अनुभवता येणार आहे. यामध्ये 350 कलाकारांसह बैलगाडी, घोडे, हत्ती यांचा समावेश असणार आहे. 120 फूट लांब आणि 60 फूट रुंदीचा भव्य रंगमंच तयार करण्यात आला आहे. एका वेळेला 15 हजार प्रेक्षक बसतील अशी आसन व्यवस्था करण्यात आली आहे. अत्याधुनिक प्रकाश व्यवस्था, डोळ्यांचे पारणे फेडणारा राज्याभिषेकाचा सोहळा आणि आकाशात होणारी डोळे दिपून टाकणारी फटाक्यांची आतषबाजी हे महानाट्याचे विशेष आहे. तालुक्यातील सर्व जनतेला हे महानाट्या पूर्णपणे मोफत पाहण्याची सोय करण्यात आली आहे. त्यामुळे पुढील चार दिवस तालुक्यातील जनतेला निश्चितच एक पर्वणी लाभणार आहे.