सुरेंद्रसिंग मेमोरियल नेमबाजी स्पर्धा : मेघना सज्जनारच्या साथीने मिळवले पदक
प्रतिनिधी/कोल्हापूर
नवी दिल्लीतील डॉ. कर्णीसिंह शूटिंगरेंजवर सुरू असलेल्या 20 व्या कुमार सुरेंद्रसिंग मेमोरियल राष्ट्रीय नेमबाजी स्पर्धेत कोल्हापूरचा आंतरराष्ट्रीय नेमबाज शाहू माने आणि मेघना सज्जनार या जोडीने रेल्वे संघाचे प्रतिनिधीत्व करताना मिश्र दुहेरीत सुवर्णपदकावर कब्जा केला. 10 मीटर एअर रायफल प्रकारात या जोडीने सुवर्ण वेध घेतला.
या स्पर्धेच्या पात्रता फेरीत शाहू माने याने सहभागी 24 संघातील 48 स्पर्धकांमधे सर्वाधिक ३१५:८ गुण पटकावले तर मेघनाने ३१३:६ गुण घेऊन त्याला सुरेख साथ दिली. या कामगिरीच्या जोरावर या जोडीने पात्रता फेरीमधे द्वितीय स्थान पटकावत अंतिम फेरीत धडक मारली. अंतिम फेरीत शाहू आणि मेघना जोडीची गाठ प्रतिस्पर्धी राजस्थान संघामधील ऑलिंपिकवीर दिव्यांशसिंग पानवार व निशा कन्वर यांच्याशी पडली. या पात्रता फेरीमध्ये या जोडीने प्रथम स्थान पटकविले होते. त्यामुळे ही जोडी शाहू आणि मेघना जोडीला कडवा प्रतिकार करेल, अशी अपेक्षा होती. मात्र शाहू व मेघना जोडीने राजस्थानच्या दिव्यांशसिंग पानवार आणि निशा कन्वर जोडीवर 16 विरूध्द 6 अशी एकतर्फी मात करत सुवर्ण पदक जिंकले.

शाहू माने केआयटी कॉलेजमध्ये मेकॅनिकलच्या दुसऱ्या वर्षांमध्ये शिकत आहे. त्याला संस्थेचे अध्यक्ष सुनील कुलकर्णी, उपाध्यक्ष साजिद हुदली, सचिव दीपक चौगुले, कार्यकारी संचालक डॉ. व्ही व्ही कार्जीन्नि, प्रभारी संचालक डॉ. एम. एम. मुजुमदार, मेकॅनिकल विभाग प्रमुख डॉ. उदय भापकर व सर्व केआयटी कॉलेजचा स्टाफचे सहकार्य लाभत आहे. दरम्यान, शाहूचे वडील तुषार आणि आई आशा माने यांनी शाहूच्या कामगिरीवर आनंद व्यक्त केला असून विश्वचषक नेमबाजी स्पर्धेतही तो देशाला सुवर्णपदक मिळवून देईल, असा विश्वास व्यक्त केला आहे.
कोरियातील विश्वचषकात शाहूचा सहभाग
कोरियात 8 जुलैपासून विश्वचषक नेमबाजी स्पर्धा सुरू होणार आहे. या स्पर्धेत शाहू मानेही सहभागी होणार आहे. जगभरातील नामवंत नेमबाज या स्पर्धेत सहभागी होणार असल्याने शाहूची कसोटी लागणार आहे. त्यासाठी भारतीय संघाच्या अर्जुन पुरस्कार विजेत्या प्रशिक्षिका सौ. सुमा शिरुर यांच्या मार्गदर्शनाखाली शाहूचा सराव सुरू आहे.