सोमवारी सकाळपासूनच खरेदीसाठी नागरिकांची धांदल : वाहनांना प्रवेशबंदी करून वाहतूक नियंत्रित
प्रतिनिधी /बेळगाव
उधाणलेला उत्साह आणि गर्दीने फुललेली बाजारपेठ पाहता बाप्पांच्या आगमनाची सर्व सिद्धता बेळगावकरांनी केली आहे. सोमवारी पहिल्या सत्रातच बाजारपेठेत खरेदीसाठी इतकी गर्दी झाली की पोलिसांना बॅरिकेड्स लावून वाहनांना प्रवेशबंदी करून वाहतूक आणि गर्दी नियंत्रित करावी लागली. सायंकाळच्यावेळी तर खरेदीसाठी नागरिकांची तोबा गर्दी झाली होती.
गणरायाचे आगमन होण्यासाठी अवघे काही तासच शिल्लक राहिल्याने गणेशभक्तांमधून जय्यत तयारी केली जात आहे. त्यामुळे शहराच्या मुख्य बाजारपेठेसह उपनगरांतील बाजारपेठांमध्ये खरेदीचा उत्साह दिसून आला. गणरायाच्या स्वागतासाठी शोभिवंत वस्तू, मखर, पडदे, कापडी मखर, फळे, फुले, कपडे, पूजेचे साहित्य, फटाके खरेदीसाठी बाजारपेठेत तोबा गर्दी झाली होती. यामुळे मुख्य मार्गांवर वाहतुकीची प्रचंड कोंडी झाली. शहरातील किर्लोस्कर रोडवर बॅरिकेड्स लावून रस्ता बंद करण्यात आला होता. चारचाकी वाहनांमुळे गर्दी वाढत असल्याने पोलिसांनी बॅरिकेड्स लावून रस्ते बंद केले होते.
शहरातील गणपत गल्ली, मारुती गल्ली, किर्लोस्कर रोड, कलमठ रोड, काकतीवेस रोड, शनिमंदिर रोड, कपिलेश्वर रोड,
एसपीएम रोड, शहापूरमधील खडेबाजार, नाथ पै चौक, खासबाग सर्कल, वडगाव बाजार गल्ली, आरपीडी रोड, अनगोळ रोड या परिसरातील दुकाने गणेशोत्सवासाठी साहित्यांनी सजली आहेत. या दुकानांमध्ये मोठय़ा प्रमाणात खरेदी केली जात आहे. गणरायाच्या स्वागतासाठी विविध आकारांमधील मखर, सजावटीचे साहित्य खरेदीसाठी तोबा गर्दी झाली. मंगळवारी मोठय़ा प्रमाणात गर्दी होणार असल्यामुळे एक दिवस पूर्वीच खरेदी करणे नागरिकांनी पसंत केले.
उपनगरांमध्ये गर्दीने फुलली बाजारपेठ
यापूर्वी केवळ शहरातील बाजारपेठेतच नागरिकांची गर्दी होत होती. परंतु आता उपनगरांमध्येही सजावटीचे सर्वच साहित्य मिळत असल्यामुळे शहरातील गर्दीत जाण्यापेक्षा उपनगरांमध्येच खरेदी केलेली बरी, अशी मानसिकता पहायला मिळत आहे. त्यामुळे उपनगरांमध्ये सजावटीचे व पूजेचे साहित्य खरेदीसाठी दुकानांमध्ये गर्दी होताना दिसत आहे. मागील दोन वर्षांत कोरोनामुळे गणेशोत्सव साध्या पद्धतीने साजरा करावा लागला होता. त्यामुळे यावषी सर्व कसर भरून काढण्यासाठी जय्यत तयारी केली जात आहे.
आगमन सोहळय़ाने शहरात धामधूम
गणेश चतुर्थी बुधवारी असली तरी त्यादिवशी होणारी गर्दी लक्षात घेऊन शहरातील अनेक गणेशोत्सव मंडळांनी एक-दोन दिवस आधीच आगमन सोहळे आयोजित केले आहेत. सोमवारी दिवसभरात बेळगाव शहरासह ग्रामीण भागातील काही गणेशोत्सव मंडळांचा आगमन सोहळा पार पडला. ढोल-ताशांच्या गजरात गणरायाचे स्वागत करण्यात आले. काकतीवेस येथील सार्वजनिक गणेशोत्सव मंडळाने वाजतगाजत गणरायाचे स्वागत केले.
पोलीस उपायुक्तांचे गर्दी टाळण्याचे आवाहन

बेळगाव ः गणेशोत्सवाच्या खरेदीसाठी बाजारपेठेत गर्दी होऊ लागली आहे. ही गर्दी टाळण्यासाठी खरेदीसाठी येणाऱया नागरिकांनी आपली वाहने बाजारपेठेबाहेरच उभी करावीत, असे आवाहन पोलीस अधिकाऱयांनी केले आहे. कार व इतर वाहनांमुळे गर्दीत भर पडत असून कोंडी टाळण्यासाठी उत्सवाच्या काळात मोठी वाहने बाजारपेठेत न आणलेलीच बरी, असे अधिकाऱयांचे म्हणणे आहे.
सोमवारी सकाळी गुन्हे तपास व वाहतूक विभागाच्या पोलीस उपायुक्त पी. व्ही. स्नेहा यांनी बाजारपेठेचा फेरफटका मारला. गर्दी टाळण्यासाठी कोणत्या उपाययोजना करायच्या, यासाठी आपल्या अधिकाऱयांना त्यांनी सूचना केल्या. मंगळवारीही बाजारपेठेत प्रचंड गर्दी अपेक्षित आहे.
ती टाळण्यासाठी व गणेशभक्तांची गैरसोय दूर करण्यासाठी आवश्यक उपाययोजना करण्याच्या सूचना त्यांनी केल्या आहेत.
खरेदीसाठी येणाऱयांपैकी अनेक जण कार, दुचाकी, ऑटोरिक्षातून बाजारपेठेत येत आहेत. कारमुळे कोंडी वाढत चालली आहे. त्यामुळे गणेशभक्तांची गैरसोय टाळण्यासाठी गर्दीच्यावेळेला खरेदीसाठी येणाऱया नागरिकांनी चारचाकी वाहने बाजारपेठेबाहेर उभी करावीत. ऑटोरिक्षा व दुचाकी उभी करताना वाहतुकीला व्यत्यय ठरणार नाही, याची काळजी घ्यावी, असे आवाहन पी. व्ही. स्नेहा यांनी केले आहे.
दरम्यान, गणेशोत्सवाच्या पार्श्वभूमीवर स्नेहा यांनी रविवारी रात्री वाहतूक विभागाचे एसीपी शरणाप्पा, खडेबाजारचे पोलीस निरीक्षक दिलीप निंबाळकर आदी अधिकाऱयांसमवेत मिरवणूक मार्गाची पायी चालत पाहणी केली. गणेशोत्सवाच्या काळात कोणत्या भागात नागरिकांची गर्दी अधिक होणार आहे? त्यासाठी कोणत्या उपाययोजना कराव्यात, यासंबंधी त्यांनी अधिकाऱयांशी चर्चा केली.