क्रीडा प्रतिनिधी /मडगाव
दुबईत झालेल्या बुडोकन दुबई कप 2022 आंतरराष्ट्रीय कराटे अजिंक्यपद स्पर्धेत गोव्यातील एकमेव स्पर्धक असलेल्या श्रृती हर्षद देवारीने सुवर्णपदक प्राप्त केले. कराटेत ब्लॅक बेल्ट असलेल्या श्रृतीने या स्पर्धेत प्रतिस्पर्धी कराटेपटूंविरूद्ध उत्कृष्ट कामगिरी केली.
या स्पर्धेत विविध देशातील कराटेपटूंनी भाग घेतला होता. श्रृती देवारी ही इंटरनॅशनल जपान कराटे असोसिएशन- इंडिया गोवाची प्रशिक्षणार्थी असून तिला गोवा आयजेकेएचे प्रशिक्षक महेंद्र नाईक व महेश कुंकळकर यांचे प्रशिक्षण लाभत आहे.