पुणे / प्रतिनिधी :
Simultaneous suicide of two childhood friends in Pune पुण्यात हडपसरमध्ये दोन बालमैत्रिणींनी एकाचवेळी आत्महत्या केल्याची घटना घडली आहे. हडपसरमधील शेवाळवाडीतील दोन १९ वर्षीय मुलींनी केलेल्या आत्महत्येच्या घटनेने परिसरात खळबळ उडाली आहे. एकीने गळफास घेतला तर दुसरीने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी मारून जीवन संपवलं. लहानपणापासून एकत्र खेळलेल्या, शिकलेल्या मैत्रिणींच्या एका पाठोपाठ आत्महत्येनं सर्वांनाच मोठा धक्का बसला आहे.
याबाबत मिळालेली माहिती अशी की, शेवाळवाडीतील सारिका हरिश्चंद्र भागवत आणि आकांक्षा औदुंबर गायकवाड अशी आत्महत्या केलेल्या मैत्रिणींची नावे आहेत. एकीने गळफास घेत आत्महत्या केली. तिला ॲम्ब्युलन्समधून रुग्णालयात नेत असताना दुसऱ्या मैत्रिणीने इमारतीवरून उडी मारली. दोघींच्या आत्महत्येचं नेमकं कारण अद्याप समजू शकलेलं नाही. दरम्यान, या प्रकरणाचा अधिक तपास हडपसर पोलीस करत आहेत. शेवाळवाडीत जिल्हा परिषद शाळेजवळ असणाऱ्या क्रिस्टल सोसायटीतील इमारतीमध्ये मंगळवारी सायंकाळी साडेसात वाजता ही घटना घडली.
अधिक वाचा : शिर्डी संस्थानचे विश्वस्त मंडळ न्यायालयाकडून बरखास्त
पोलिसांनी सांगितले की, सारिकाने घरात साडीने गळफास घेत आत्महत्या केली. याची माहिती मिळताच पोलीस घटनास्थळी पोहोचले, पण सारिकाचा मृत्यू झाला होता. तिचा मृतदेह पोलीस रुग्णवाहिकेतून नेत असतानाच सारिकाची बालमैत्रिण आकांक्षा हिने पाहिलं. त्यानंतर आकांक्षाने इमारतीच्या पाचव्या मजल्यावरून उडी घेत आत्महत्या केली. यात तिचाही जागीच मृत्यू झाला.
लहानपणापासूनच्या दोन मैत्रिणींनी अशा पद्धतीने जीवन संपवल्याने परिसरात हळहळ व्यक्त केली जात आहे. दोघींच्याही आत्महत्येचं कारण अस्पष्ट आहे. हडपसर पोलीस याप्रकरणाचा अधिक तपास करत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अरविंद गोकुळे यांनी दिली.