
कौलालंपूर : भारताचे स्टार बॅडमिंटनपटू पीव्ही सिंधू, एचएस प्रणॉय, किदाम्बी श्रीकांत यांनी मलेशिया मास्टर्स बॅडमिंटन स्पर्धेच्या उपांत्यपूर्व फेरीत प्रवेश मिळविला. ऑलिम्पिक पदकविजेती व येथे सहावे मानांकन मिळालेल्या पीव्ही सिंधूने जपानच्या आया ओहोरीचा सरळ गेम्सनी पराभव केला. तिने 28 व्या मानांकित ओहोरीवर केवळ 40 मिनिटांत 21-16, 21-11 अशी सहज मात केली. सिंधूने आजवर तिच्यावर पूर्ण वर्चस्व राखले असून आतापर्यंत झालेल्या बाराही लढतीत तिने ओहोरीवर विजय मिळविला आहे. सिंधूची पुढील लढत चीनच्या यि मान झँगशी होईल. पुरुष एकेरीत जागतिक नवव्या मानांकित प्रणॉयला चीनच्या शि फेंग लिवर विजय मिळविण्यासाठी संघर्ष करावा लागला. प्रणॉयने ऑल इंग्लंड चॅम्पियन व जागतिक अकराव्या मानांकित लि याला 13-21, 21-16, 21-11 असा पराभवाचा धक्का दिला. एक तास दहा मिनिटे ही लढत रंगली होती. त्याची पुढील लढत इंडोनेशियाच्या तिसऱ्या मानांकित जोनातन ख्रिस्ती किंवा जपानचा केन्टा निशिमोटो यापैकी एकाशी होईल.