वृत्तसंस्था / हैदराबाद
गुजरातमध्ये 29 सप्टेंबर रोजी होणाऱया 36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला भारताची अव्वल महिला बॅडमिंटनपटू तसेच दोनवेळा ऑलिम्पिक स्पर्धेत पदक मिळविणारी पी. व्ही. सिंधू दुखापतीच्या स्थितीतही उपस्थित राहणार आहे.
बर्मिंगहॅममध्ये झालेल्या राष्ट्रकुल क्रीडा स्पर्धेत पी. व्ही. सिंधूच्या घोटय़ाला ही दुखापत झाली होती. सिंधूची ही दुखापत बरी होण्याच्या मार्गावर आहे. तरी पण तिने या स्पर्धेच्या उद्घाटन समारंभाला उपस्थित राहण्याचे ठरविले आहे. पण दुखापतीमुळे आपण या स्पर्धेत तेलंगणा संघाचे प्रतिनिधीत्व करू शकत नाही असेही म्हटले आहे. देशातील प्रत्येक खेळाडूला राष्ट्रीय क्रीडा स्पर्धा ही महत्त्वाची असते. या स्पर्धेतूनच तो आपली कारकीर्द घडवू शकतो, असेही सिंधूने वृत्तसंस्थेशी बोलताना सांगितले.
36 व्या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेतील बॅडमिंटन या क्रीडा प्रकाराला सुरतमध्ये 2 ऑक्टोबरपासून प्रारंभ होणार आहे. सिंधूने 2016 च्या रिओ ऑलिम्पिक स्पर्धेत रौप्यपदक तर 2021 च्या टोकियो ऑलिम्पिक स्पर्धेत कास्यपदक मिळविले होते. भविष्यकाळात जागतिक स्तरावरील स्पर्धांमध्ये पदके मिळविण्याची सिंधूची भूक अद्याप पूर्ण झालेली नाही. या राष्ट्रीय क्रीडा स्पर्धेत पी. व्ही. सिंधू तेलंगणा राज्याचे दुखापतीमुळे प्रतिनिधीत्व करू शकणार नाही.