संशयित आरोपीचे वडील ग्रामपंचायत सदस्य
सोलापूर / प्रतिनिधी
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदेंचा मोबाईल चोरण्याचा प्रयत्न केल्याप्रकरणी सोलापूर जिह्यातील माढा तालुक्यातील घाटणे गावच्या राष्ट्रवादीच्या ग्रामपंचायत सदस्याच्या मुलाला अटक करण्यात आली आहे. गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास कल्याण ते दादर यादरम्यान सिद्धेश्वर एक्स्प्रेसमध्ये घडला.
मंदार प्रमोद गुरव (वय 23, रा. घाटणे, ता. माढा, जि. सोलापूर) असे अटक करण्यात आलेल्या आरोपीचे नाव आहे. माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे व त्यांची कन्या आ. प्रणिती शिंदे यांना मुंबई येथे कामानिमित्त जायचे होते. त्यामुळे त्यांचे रिझर्वेशन हे (गाडी नं. 12116 सिद्धेश्वर एक्स्प्रेस) बोगीच्या एचए-1 कंपार्टमेंटमधील कुपी नं. ए मध्ये केले होते. त्यावेळी विलास कृष्णकांत गावकर व संजय तुकाराम राजेशिर्के या पोलिसांची पीएसओ म्हणून नेमणूक करण्यात आलेली होती.
दरम्यान, गुरुवारी सकाळी सहाच्या सुमारास रेल्वे स्टेशन येण्यापूर्वी शिंदे हे बाथरूमला गेले होते. ते बाहेर आल्यावर त्यांना, मंदार गुरव त्यांच्या सीटवर ठेवलेला मोबाईल फोन घेऊन जाण्याचा प्रयत्न करत असल्याचे दिसले. त्यांनी त्यास रंगेहाथ पकडून ठेवून पोलीस अंमलदार गावकर व राजेशिर्के यांच्या ताब्यात दिले. या प्रकरणी पोलीस अंमलदार गावकर यांनी दिलेल्या फिर्यादीवरून दादर रेल्वे पोलीस ठाण्यात मंदार विरोधात गुन्हा दाखल करण्यात आला आहे.
माजी केंद्रीय गृहमंत्री सुशीलकुमार शिंदे यांचा मोबाईल चोरी करण्याचा प्रयत्न करणारा मंदार राष्ट्रवादी काँग्रेस पक्षाच्या सदस्याचा मुलगा आहे.
मंदारचे कुर्डुवाडीत दुकान
मंदार हा दसरा मेळाव्याकरिता मुंबईला गेला होता असे समजते. त्याचे कुर्डुवाडीत ड्रीप आणि शेतीला लागणाऱ्या पाईपचे दुकान आहे. वडील ग्रामपंचायत सदस्य तर चुलते उच्च पदावर आहेत.