काँगेसचे नेते राहुल गांधी त्यांच्या ब्रिटन दौऱयात केलेल्या अनेक विधानांमुळे सध्या बराच गोंधळ उडाला आहे. काँगेसवर टीका करण्यासाठी भारतीय जनता पक्षाच्या हाती नवे कोलित लागले आहे, तर गांधींच्या विधानांचा अर्थ स्पष्ट करताना त्यांच्याच पक्षाच्या प्रवक्त्यांची कोंडी होत आहे. तथापि, मूळ प्रश्न राहुल गांधींनी काय बोलावे हा नाही. तर ते कोठे आणि केव्हा बोलावे, हा आहे. भारतात लोकशाहीची गळचेपी होत आहे. विरोधी पक्षाचे नेते बोलताना त्यांचे ध्वनिक्षेपक बंद केले जातात. ब्रिटन आणि युरोपियन देशांनी यामुळे भारतात हस्तक्षेप करावा. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ ही मुस्लीम ब्रदरहूड प्रमाणे टोकाची धर्मवादी संघटना आहे. देशाच्या प्रत्येक संस्थेत आता संघाच्या लोकांनी प्रवेश करुन मोक्याची स्थाने पटकाविली आहेत, आदी विधाने तर त्यांनी केली आहेतच, शिवाय, चीन हा शांतताप्रिय आणि निसर्गाशी जुळवून घेणारा देश आहे. भारत आणि अमेरिकेत मात्र निसर्गाशी जुळवून घेतले जात नाही. काश्मीर हा ‘हिंसक’ प्रदेश आहे, अशी आश्चर्यकारक प्रतिपादनेही केली. त्यांना ही माहिती कोण देते हा संशोधनाचा विषय आहे. तसेच मिळालेली माहिती ते पडताळून पाहतात की नाही, याबद्दल शंका वाटते. ते भारतात किंवा भारताबाहेर वारंवार अशी किंवा अशा प्रकारची बरीच विधाने करतात. पण या विधानांमुळेच लोकशाहीची भारतात पायमल्ली होत आहे, असा त्यांचा आरोप विनोदी ठरतो. कारण भारतात जर लोकशाही जिवंत आणि क्रियाशील नसती तर त्यांना अशी विधाने करताच आली नसती. 1975 ते 1977 हा आणीबाणीचा काळ ज्यांना आठवतो, ते यासंबंधी सांगू शकतील. आणीबाणी ही राहुल गांधी यांच्या आजींनीच लादली. त्या संपूर्ण 2 वर्षांच्या कालखंडात इंदिरा गांधी किंवा काँगेस यांच्यावर टीका करण्याची सोयच नव्हती. भलीभली वृत्तपत्रेही गप्प होती. ती लोकशाहीची खरी हत्या होती. सध्या तशी परिस्थिती नाही, हे सर्व सूज्ञ जाणतात. त्यामुळे गांधींची सध्याच्या लोकशाहीसंबंधीची विधाने आपोआपच खोटी ठरतात. भारतातील लोकशाही वाचविण्यासाठी ब्रिटन आणि युरोपने हस्तक्षेप करावा, असे आवाहनही ते करतात. हे आवाहनही त्यांच्या आरोपांइतकेच हास्यास्पद आहे. मुळात हस्तक्षेप करण्याचे कोणतेही कारण नाही. शिवाय हस्तक्षेप करायचा म्हणजे नेमके काय करायचे? भारताशी संबंध तोडायचे? भारताशी युद्ध पुकारायचे?, भारतावर आर्थिक निर्बंध लादायचे, की भारतावर बहिष्कार टाकायचा? हे गांधी यांनी स्पष्ट केलेले नाही. कदाचित यांपैकी कोणता उपाय अधिक प्रभावी ठरेल, हे त्यांचे त्यांना किंवा त्यांच्या सल्लागारांना अजून ठरविता आले नसावे. अन्यथा त्यांनी तो उपाय सुचविलाही असता आणि काँगेसचीच अधिक पंचाईत करुन ठेवली असती. राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संस्थेवर ते नेहमीच रागावलेले असतात. कारण समजत नाही. कारण न समजण्याचे कारण असे की, राष्ट्रीय स्वयंसेवक संघ या संघटनेची सर्वाधिक वाढ आणि विस्तार काँगेसच्याच सत्ताकाळात झाला. संघावर काहीवेळा बंदी घालण्यात आली, हे खरे आहे. तथापि, काही काळातच ही बंदी, ज्यांनी घातली त्यांनीच उठविली होते. काँगेसच्या साधारणतः साठ वर्षांच्यग्ना सत्ताकाळात काँगेसजनांनी संघावर राहुल गांधी आज करतात तसे आरोप कित्येकदा केले आहेत. पण इतक्या प्रदीर्घ काळात संघावर सोडाच, पण चार-पाच स्वयंसेवकांवरही कोणताही आरोप सिद्ध झालेला नाही. तरीही असे आरोप गांधींनी करावेत यातून संघ कसा आहे, हे सिद्ध होत नाही, तर आरोप करणाऱयाचे अज्ञान किती सखोल आणि गंभीर आहे, हे मात्र लोकांना समजते. यातून आरोप करणाऱयांचीच नाचक्की होते, याचे भान राखले जात नाही. दुसऱयांवर आरोप करणाऱया राहुल गांधींवरच आरोप आहेत, आणि सध्या ते जामिनावर बाहेर आहेत. संघाची मानहानी करण्याचा आरोपही त्यांच्यावर आहे आणि त्यासंबंधीची कारवाई न्यायालयात सुरु आहे. त्यांच्या पदयात्रेच्या काळात त्यांनी स्वातंत्र्यवीर सावरकर, संघ यांना लक्ष्य केले होतेच. त्यातून काहीही साध्य झाले नाही. इतकेच कशाला, ब्रिटीश सत्तेविरोधात प्राणपणाने झुंजलेले मध्यप्रदेशातील वनवासी वीरयोद्धे तंटय़ामामा भिल्ल यांचा इतिहासच गांधींनी बदलला होता आणि आपल्या काल्पनिक आरोपांना अनुकूल ठरेल असा करुन घेतला होता. तंटय़ामामा यांना संघाने पकडून ब्रिटीशांच्या ताब्यात दिले आणि नंतर ब्रिटीशांनी त्यांना फासावर लटकविले असे गांधी यांचे म्हणणे होते. पण खरा इतिहास असा आहे की, तंटय़ामामा यांना फाशी झाली. त्याच्यानंतर 30 वर्षांहूनही अधिक काळानंतर संघ जन्माला आला होता. तसेच संघसंस्थापक डॉ. केशव बळीराम हेडगेवार हे देखील भिल्ल यांच्या फाशीच्या वेळी जास्तीत जास्त तीन चार वर्षे वयाचे असावेत. त्यामुळे असे बिनबुडाचे आरोप करुन आपण स्वतःचीच हानी करुन घेत आहोत, हे गांधींच्या लक्षात येत नाही. भारतात हे एकवेळ चालू शकेल. कारण येथे लोकशाही भक्कम आहे आणि लोकशाहीचा अर्थ कोणीही काहीही बोलावे असा (विशेषतः विरोधी पक्षांकडून) घेतला जातो. पण विदेशात जिथे लोकशाहीकडे जास्त गंभीरपणे पाहिले जाते, जेथील लोकशाही अधिक प्रगल्भ मानली जाते, तेथे असे वारेमाप अणि अद्वातद्वा आरोप करणे प्रशस्त मानले जात नाही. आणीबाणी संपल्यानंतर आणि जनता पक्षाचे सरकार आल्यानंतर इंदिरा गांधींच्या विरोधात न्या. शहा आयोग नेमण्यात आला. नंतर जेव्हा इंदिरा गांधी ब्रिटनमध्ये गेल्या होत्या, तेव्हा त्यांना शहा आयोगाकडून त्यांच्यावर करण्यात आलेल्या कारवाईसंबंधी प्रश्न विचारण्यात आला होता. तथापि, ‘माझ्या देशात काय होत आहे, याविषयी मी विदेशात काहीही बोलणार नाही’ असे चपखल उत्तर देऊन इंदिरा गांधींनी विदेशात आपल्या देशासंबंधी कसे बोलायचे असते याचा जणू वस्तूपाठच घालून दिला होता. ही बाब एका पत्रकाराने राहुल गांधींच्या लक्षात आणून दिली होती. त्यावरुन तरी गांधींनी काही धडा घेणे आवश्यक आहे. विदेशात बोलताना जरा जपून आणि परिस्थितीचे भान राखून बोलणे आवश्यक आहे, एवढेच सुचवावेसे वाटते.
Previous Articleक्रिकेटमधून सहकार्यवृद्धीची मुत्सद्देगिरी
Next Article अमेरिकेची गुप्त बैठक, तालिबानवर संकट
Related Posts
Add A Comment